‘लोकमत’चे माजी संपादकीय संचालक निर्मलकुमार दर्डा कालवश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 10:04 IST2025-12-28T10:02:46+5:302025-12-28T10:04:01+5:30
वितरण आणि वृत्तपत्र क्षेत्रातील भीष्माचार्य अशी ओळख असलेल्या निर्मलबाबूंनी ‘लोकमत’चे जाळे महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतली.

‘लोकमत’चे माजी संपादकीय संचालक निर्मलकुमार दर्डा कालवश
पुणे : लोकमत वृत्तपत्र समूहाचे माजी संपादकीय संचालक निर्मलकुमार खुशालचंद दर्डा उर्फ निर्मलबाबू (वय ७६) यांचे शनिवारी निधन झाले. वितरण आणि वृत्तपत्र क्षेत्रातील भीष्माचार्य अशी ओळख असलेल्या निर्मलबाबूंनी ‘लोकमत’चे जाळे महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतली. ‘लोकमत’चे वरिष्ठ महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
पुलगाव (जि. वर्धा) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, संचालक अशोक जैन, किशोर दर्डा यांच्यासह लोकमत परिवारातील अनेक सदस्य, मान्यवर नागरिक उपस्थित होते. निर्मल दर्डा अतिशय शिस्तप्रिय होते, गुणग्राहक होते आणि अविश्रांतपणे त्यांनी काम केले, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, डॉ. वसंत भोसले आणि मधुकर भावे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘लोकमत जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित
वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर त्यांना कायद्याचा अभ्यास करायचा होता, परंतु बाबूजींच्या सल्ल्यानुसार ते ‘लोकमत’मध्ये व्यवस्थापक म्हणून सामील झाले. वितरण आणि व्यवस्थापनासोबत संपादकीय दृष्टिकोनही हवा, या जाणिवेतून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्यव्यापी नेटवर्क तयार केले. राज्यात ‘लोकमत’च्या महत्त्वाच्या आवृत्त्या सुरू करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. वृत्तपत्रविश्वातील त्यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘लोकमत जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते.
‘लोकमत’च्या प्रारंभीच्या काळात निर्मलबाबू यांच्यासोबत रात्रंदिवस केलेले काम हा माझ्या आयुष्यातला अनमोल ठेवा आहे. माझ्या मनाशी त्यांच्या नावाचा दिवा अखंड तेवत राहील.
डॉ. विजय दर्डा, चेअरमन, लोकमत माध्यम समूह
विदर्भ, मराठवाडा, खान्देश या विभागात तर निर्मलबाबूंनी ‘लोकमत’च्या वितरणाचे जाळे भक्कम केलेच, शिवाय मुंबई आणि पुणे या आवृत्त्यांच्या यशातही त्यांचा वाटा सिंहाचा होता.
राजेंद्र दर्डा, एडिटर इन चीफ, लोकमत
पहिल्या अंकापासून प्रवास
‘लोकमत’ महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचावा, हे श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणे हे निर्मलबाबू यांनी आपले ध्येय बनवले आणि ‘लोकमत’ वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. लोकमत समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आणि एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी तयार केलेल्या टीमचे ते खंदे शिलेदार होते. ‘लोकमत’च्या पहिल्या अंकापासून निर्मलबाबू यांचा प्रवास सुरू झाला.