महिला उमेदवाराच्या घरात शिरुन अंगावर गुलाल टाकत धमकाविण्याचा प्रकाऱ; कुडज गावातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 14:05 IST2021-01-16T14:05:28+5:302021-01-16T14:05:59+5:30
विरोधी पॅनेलमधील दोघे जण रात्री उशिरा गुलालाचे पोते घेऊन जबरदस्तीने महिला उमेदवाराच्या घरात शिरले..

महिला उमेदवाराच्या घरात शिरुन अंगावर गुलाल टाकत धमकाविण्याचा प्रकाऱ; कुडज गावातील घटना
पुणे : मतदान संपल्यानंतर महिला उमेदवाराच्या घरात शिरुन त्यांच्या अंगावर गुलाल टाकून धमकाविण्याचा प्रकार कुडज गावात घडला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
सुमित राजेंद्र घुमे (वय २४) आणि मयंक कैलास कांबळे (वय २४, रा. कुडज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २९ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. कुडज गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे शुक्रवारी मतदान होते. फिर्यादी या तळजाई माता पॅनेलमधून निवडणुक लढवत आहेत. मतदान संपल्यानंतर त्या घरी गेल्या. त्यांच्या विरोधी भैरवनाथ पॅनेलमधील दोघे जण रात्री उशिरा गुलालाचे पोते घेऊन जबरदस्तीने त्यांच्या घरात शिरले. त्यांचा हात पकडण्याचा प्रयत्न करुन अंगावर गुलाल टाकला. विरोधात उभी राहतेस काय, तुला निकालाच्या दिवशी बघुन घेतो नाही खलास केले तर बघ अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत