पुणे: जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी होणे ही दुर्देवी घटना आहे. यासाठी दीर्घ व तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील. या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी २०० पिंजरे तातडीने लावण्यात येतील. आणखी १० कोटी खर्चून १ हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच त्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. दरम्यान शिरूर येथील घटनेनंतर वन विभागाने तातडीने संबंधित नरभक्षक बिबट्याला जेरबंद केले आले आहे. या बिबट्याचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांच्या मानवावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाईक यांनी मंगळवारी (दि. ४) मंत्रालयात बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी माजीमंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) एम. श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे उपस्थित होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा पोलीस प्रमुख संदीप सिंग गिल हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
नाईक म्हणाले, “बिबट्यांची संख्या वाढल्याने त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी व हल्ल्याच्या घटना घडू नयेत, यासाठी दीर्घ व अल्पकालीन उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील. युद्धपातळीवर या परिसरात वन विभागांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल. केंद्र सरकारच्या परवानगीने या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे स्थलांतर वनतारा, इतर राज्यात किंवा ज्यांना अधिकार आहे, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सोय उपलब्ध आहे, तेथे पाठविण्यात येतील. वनाशेजारील शेतीला व गोठ्यांना विद्युत तारांचे कुंपण लावणे, एआयच्या माध्यमातून बिबट्यांची हालचालीची माहिती नागरिकांना कळविणे, शेतीला दिवसा पूर्ण ताकदीने वीज पुरवठा करणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना आज देण्यात आल्या आहेत. तसेच या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तातडीने २०० पिंजरे खरेदी करण्यात येतील. त्याशिवाय वन विभागाच्या निधीतून आणखी १ हजार पिंजरे तातडीने खरेदीसाठी १० कोटींचा निधी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”
वन विभागाला लागणारी वाहने, पिंजरे व इतर साहित्य तातडीने पुरविण्याचे व त्यासाठी लागणारा निधी देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. नागरिकांच्या जिवीताचा प्रश्न असल्याने यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता पडू न देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. वाढती संख्या रोखण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता मिळण्यासाठी सर्वपक्षीय नेते व वन अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय वनमंत्री यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार आहे. लवकरच या घटनास्थळी भेट देऊन लोकप्रतिनीधींबरोबर चर्चा करण्यात येईल, अशी माहितीही नाईक यांनी यावेळी दिली.
Web Summary : Maharashtra Forest Minister announced plans to purchase 1000 cages costing ₹10 crore to capture leopards in Junnar, Ambegaon, Rajgurunagar, and Shirur, following increased human-leopard conflict. Immediate measures include deploying 200 cages and relocating captured leopards. Sterilization proposal sent to central government to control leopard population.
Web Summary : महाराष्ट्र के वन मंत्री ने जुन्नर, आंबेगांव, राजगुरुनगर और शिरूर में तेंदुओं को पकड़ने के लिए ₹10 करोड़ की लागत से 1000 पिंजरे खरीदने की योजना की घोषणा की। तत्काल उपायों में 200 पिंजरे तैनात करना और पकड़े गए तेंदुओं का स्थानांतरण शामिल है। तेंदुए की आबादी को नियंत्रित करने के लिए केंद्र सरकार को नसबंदी का प्रस्ताव भेजा गया।