पुणे: डीआरआय आणि कस्टम यांनी केलेल्या संयुक्तिक कारवाईत दिल्लीहून बंगळुरू असा ट्रॅव्हल्सने प्रवास करीत असलेल्या विदेशी महिलेला अमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तिच्या ताब्यातून तब्बल ३ किलो ८१५ ग्रॅम हा क्रिस्टल मेथ हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात ७ कोटी ६३ लाख रुपये एवढी किंमत आहे.
एक विदेशी महिला ही तिच्या सामानासोबत बेकायदेशिररीत्या बंदी असलेला अमली पदार्थ घेऊन चालली असल्याची माहिती डीआरआच्या (डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) पुणे पथकाला मिळाली होती. त्यानुसार डीआरआय आणि कस्टम (सीमा शुल्क विभाग, पुणे) विभागाने मुंबई-बंगळुरू महामार्गावर सापळा लावला. या महामार्गावरून जात असलेली संशयित ट्रॅव्हल्स पथकाने आडवून संबंधित महिलेच्या सामानाची तपासणी केली. सुरुवातील पथकाला महिलेच्या बॅगेत काहीही आढळून आले नाही. बसची पूर्ण तपासणी केल्यानंतर तिने तिची दुसरी बॅग बसच्या मागील बाजूला लपवून ठेवल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. दुसरी बॅग तपासल्यानंतर त्या बॅगमध्ये कपडे होते. त्यातील सहा सलवार-सूटमध्ये विशेष कागदी फळ्या लावून पॉलिथिनच्या अस्तरात क्रिस्टल मेथ लपवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तपासात हा पदार्थ क्रिस्टल मेथ असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी महिलेकडून ७ कोटी ६३ लाखांचा ३ किलो ८१५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आला. क्रिस्टल मेथ जप्त करून संशयित महिलेला एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे डीआरआयने कळविले आहे.
क्रिस्टल मेथ म्हणजे काय?
क्रिस्टल मेथ हा एक अत्यंत घातक अमली पदार्थ आहे. याचे वैज्ञानिक नाव मेथॅम्फेटामाइन आहे. हे एक कृत्रिम रासायनिक औषध आहे. अत्यंत उत्तेजक असलेला हा अमली पदार्थ मेंदू आणि मज्जासंस्थेवर तीव्र परिणाम करतो.