इतिहास घडला : एनडीएतून प्रथमच महिला कॅडेट्सची तुकडी बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:33 IST2025-05-30T10:33:18+5:302025-05-30T10:33:38+5:30

हे यश केवळ तुमचे नाही, हजारो तरुणींसाठी प्रेरणा : कुलगुरू पुनम टंडन

For the first time a batch of women cadets leaves the NDA | इतिहास घडला : एनडीएतून प्रथमच महिला कॅडेट्सची तुकडी बाहेर

इतिहास घडला : एनडीएतून प्रथमच महिला कॅडेट्सची तुकडी बाहेर

पुणे : एनडीएमधून अनेक अधिकारी घडले आहेत. मात्र, यंदाचे वैशिष्ट्य वेगळे असून, प्रथमच महिला कॅडेट्सची तुकडी उत्तीर्ण होत आहे. याचा विशेष आनंद होत आहे. मुलींनो, तुम्ही दाखविलेले धैर्य व क्षमतेच्या जोरावर यश संपादन केले आहे. तुमचे यश केवळ तुमचे स्वतःचे नसून, भारतातील हजारो तरुणींसाठी प्रेरणा असल्याचे प्रतिपादन दीनदयाळ उपाध्याय गोरखपूर विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. पूनम टंडन यांनी केले.

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) इतिहासात यंदा एक नवा अध्याय लिहिला गेला. पहिल्यांदाच महिला कॅडेट तुकडी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण करून त्यांचा दीक्षान्त समारंभ गुरुवारी पार पडला. यामध्ये बीएससी शाखेत ८४ विद्यार्थी, बीएससी कम्प्युटर सायन्स ८५ विद्यार्थी, कला शाखेतील ५९ विद्यार्थी आणि बीटेकमधील १११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण ३३९ कॅडेट्सचा दीक्षान्त समारंभ पार पडला. यावेळी एनडीए कमांडंट व्हाइस अॅडमिरल गुरचरण सिंग, एअर व्हाइस मार्शल सिद्धार्थ बेदी यांच्यासह एनडीएच्या वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

श्रिती पहिली महिला सिल्व्हर मेडलिस्ट

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) इतिहासात यंदा पहिल्यांदाच महिला कॅडेटस् ची तुकडी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडली. या तुकडीत १७ महिला आणि ३०० हून अधिक पुरुष कॅडेट्स आहेत. यामध्ये कला शाखेत श्रिती दक्ष हिला सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले. एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला सिल्व्हर मेडल मिळाले आहे.

माझ्या परिवारातील संरक्षण विभागात काम करणारी ही चौथी पिढी असेल. मला भारतीय नौदलात काम करायचे असून, उत्कृष्ट कामगिरी केल्याचा आनंद होत आहे. एनडीएत प्रवेश घेतला तेव्हा सुरुवातीला भावनिक असल्यामुळे तीन वर्षे याठिकाणी काढू शकेन, ही शंका होती. मात्र, भावनिक बाब मी ताकद म्हणून वापरली आणि आज चांगली कामगिरी करू शकलो आहे- उदयवीर सिंग नेगी, (एनडीए कॅडेट)
 

Web Title: For the first time a batch of women cadets leaves the NDA