चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसाठी पाठपुरावा करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 20:52 IST2025-07-23T20:51:11+5:302025-07-23T20:52:05+5:30

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त योगेश म्हसे यांचे निर्देश 

Follow up on road repairs in Chakan Industrial Area | चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसाठी पाठपुरावा करा

चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसाठी पाठपुरावा करा

पिंपरी : चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीसह रस्त्याच्या समस्यांमुळे नागरिकांसह व्यवसायिकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे यासंदर्भात पडताळणी करून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले. 

रस्ते दुरुस्तीच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करणे अपेक्ष‍ित आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर मात करण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत महानगर आयुक्त यांनी पीएमआरडीए कार्यालयात बुधवारी (दि. २३ जुलै) विविध यंत्रणांची आढावा बैठक घेतली. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, आमदार बाबाजी काळे, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, महागनर न‍ियोजन सम‍िती सदस्य वसंत भ‍से यांच्यासह औद्योगिक संघटना, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते खराब झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून रहदारीला अडचणी येत आहे. यासह वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत आहे, यावर पर्यायी मार्ग म्हणून संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयातून रस्ते दुरुस्त करत या भागातील अतिक्रमणे तात्काळ काढून आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रासह इतर ठ‍िकाणची अतिक्रमणे काढून घेत रस्त्यावर उभे राहणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी एमआयडीसी, पोलिस यंत्रणेला निर्देश देण्यात आले. नागरी सुव‍िधांसाठी एमएसआरडीसी, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी आदी विभागांनी चाकण हद्दीतील रस्त्यासंदर्भात पाठपुरावा करून यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे अपेक्ष‍ित आहे. यासह संबंध‍ित यंत्रणांनी तातडीच्या उपाययोजना हाती घेण्याचे न‍िर्देश यावेळी महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी द‍िले.

औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करत त्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. यासह वाहतूक कोंडी निराकरणासाठी नवीन पर्यायी मार्गाचा विचार करून तातडीने त्यासंबंधीचा अहवाल तयार करण्याचे निर्देश शासकीय यंत्रणांना देण्यात आले. यावेळी पुणे - नाश‍िक रस्ता, तळेगाव - चाकण - शिक्रापूर, माेई ते चिखली, निघोजे ते कुरळी, चाकण ते आळंदी अशा विविध रस्त्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली.

Web Title: Follow up on road repairs in Chakan Industrial Area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.