पुणे: सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौक ते फनटाइम थिएटर यादरम्यान उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने या परिसरातील व्यावसायिकांना रान मोकळे मिळाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. उड्डाणपुलाखाली रस्ता दुभाजकाला लागून दोन्ही बाजूंना व्यवसायिकांची चारचाकी वाहने व टेम्पो बेकायदेशीरपणे पार्किंग केली जात आहे. याशिवाय दोन्ही बाजूंच्या पदपथांना दुचाकी व चारचाकींचा विळखा पडलेला असतो, तर पदपथावर अतिक्रमणे, त्यामुळे पादचाऱ्यांना आणि वहानचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
नरवीर तानाजी मालुरसे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरातील वडगाव, धायरी, नर्हे, खडकवासला गावांचा झपाट्याने विकास होत आहे. शिवाय सिंहगड, खानापूर, पानशेत या परिसरातूनही शहरात ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातच सिंहगड रस्त्याला दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने दिवसेंदिवस वाहतूककोंडी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने राजाराम पूल ते फनटाईम थिएटर या दरम्यान दोन उड्डाणपूल उभारले आहेत. एक उड्डाणपूल राजाराम चौकात आणि दुसरा विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर. राजाराम पूल चौकातील आणि विठ्ठलवाडी ते फनटाइम यादरम्यानचे उड्डाणपूल यापूर्वीच वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. उड्डाणपुलाचा शेवटचा टप्पा असलेला माणिक बाग ते विठ्ठलवाडी हा उड्डाणपूल नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
उड्डाणपूल पूर्णपणे वाहतुकीला खुला झाल्याने वाहनचालकांची व नागरिकांची कोंडीतून सुटका झाली असली, तरी विठ्ठलवाडी ते माणिकबाग या दरम्यानच्या व्यावसायिकांमुळे नवीनच समस्या निर्माण झाली आहे. उड्डाणपुलाखाली रस्ता दुभाजकाला लागून दोन्ही बाजूंना व्यवसायिकांची चारचाकी वाहने व टेम्पो बेकायदेशीरपणे पार्किंग केली जात आहेत. याशिवाय दोन्ही बाजूंच्या पदपथांच्या बाजूस बेकायदेशीरपणे दुचाकी चारचाकी पार्किंग केल्या जातात. दुसरीकडे पदपथावर फळभाज्या विक्रेते आणि दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतूक पोलिसांची डोळेझाक
सिंहगड रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे पार्किंग केल्या जाणाऱ्या दुचाकी उचलण्यासाठी टोईंग गाड्या वारंवार फिरत असतात. दोन मिनिटांच्या कामासाठी दुचाकी लावली आणि वाहतूक पोलिसांनी ती उचलून नेली, तर नागरिकांना दुचाकी शोधण्यासाठी व सोडवून घेण्यासाठी पाऊण तास वाया घालवावा लागत आहे. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उड्डाणपुलाच्या खाली बेकायदेशीरपणे पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांकडे मात्र, वाहतूक पोलिस डोळेझाक करतात. चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलिस कारवाई का करत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.