बंगळुरू, दिल्लीला जाणाऱ्या विमानांना तीन तास उशीर; हुडहुडी भरणाऱ्या थंडीत प्रवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 21:14 IST2025-12-25T21:14:02+5:302025-12-25T21:14:20+5:30
ऐन हिवाळ्यात सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे विमानांना उशीर होत असल्याचे दिसून येत आहे

बंगळुरू, दिल्लीला जाणाऱ्या विमानांना तीन तास उशीर; हुडहुडी भरणाऱ्या थंडीत प्रवाशांची गैरसोय
पुणे : लोहगावविमानतळावरून बंगळुरू, दिल्ली, इंदूर आणि नागपूरला जाणाऱ्या विमानांना गुरुवारी (दि. २५) पहाटे अनुक्रमे तीन आणि दोन तास उशीर झाला. यामुळे विमानतळावर वेळेत आलेल्या प्रवाशांना तब्बल चार तासांहून अधिक काळ वाट पाहत थांबावे लागले. हुडहुडी भरणाऱ्या थंडीत विमानांना सातत्याने होणाऱ्या उशिरामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पुण्याहून बंगळुरूसाठी पहाटे पाच वाजता इंडिगोची विमाने होती. सकाळी सात वाजले तरी प्रवाशांना याबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती. शेवटी वारंवार विचारणा केल्यावर बंगळुरूवरून येणाऱ्या विमानाला उशीर झाल्यामुळे पुण्यातून जाणाऱ्या विमानाला उशीर होत आहे, असे विमान कंपनीकडून सांगण्यात आले. शेवटी पहाटे सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी उड्डाणे केले. तसेच सकाळी पहाटे पाच वाजून १५ मिनिटांनी दिल्लीला जाणाऱ्या विमानाला अडीच तास उशीर झाला. याशिवाय नागपूर आणि इंदूरला जाणाऱ्या विमानांना दोन तास उशीर झाला. सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे विमानांना उशीर होत आहे, असे दिसून येते.