पावसाळी कामांसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा; मुरलीधर मोहोळ यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 18:11 IST2025-05-19T18:10:40+5:302025-05-19T18:11:15+5:30
यंदा पावसाळ्यामध्ये कोणत्याही भागात पाणी शिरू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घ्या, त्याप्रमाणे अहवाल तयार करा

पावसाळी कामांसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा; मुरलीधर मोहोळ यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना
पुणे : गेल्या काही वर्षांपासून कमी वेळेत अधिक पाऊस पडत असल्याचा नवीन ट्रेंड दिसत आहे. यंदा पावसाळ्यामध्ये कोणत्याही भागात पाणी शिरू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घ्या. यासाठी पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांचे छायाचित्र, व्हिडीओ मागवून त्याचा अहवाल तयार करा. कामाच्या निविदा कमी दराने आल्याने कामाच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी (दि.१६) महापालिका प्रशासनाला केल्या.
पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या विविध कामांचा आढावा केंद्रीय राज्यमंत्री माेहाेळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडून घेतला. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी या आढावा बैठकीस उपस्थित होते. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोहोळ म्हणाले, ज्या ठिकाणी पावसाने पाणी साठून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, त्या जागेवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुण्यात ८७५ किलोमीटरचे एकूण नाले आहे. त्याबाबत सफाई तपासणी करण्यात येत आहे. नालेसफाईची यंदा २३ टेंडर मनपाने काढली असून, पावसाळी कामाबाबत १५ टेंडर काढून कामे करण्यात येत आहेत. कामाच्या निविदा कमी दराने आल्याने कामाच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा, अशा सूचना केल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
पुण्यात आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवू
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आमच्या नेत्यांनी जाहीर केल्यानुसार आम्ही पुण्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, अशी माहिती मोहोळ यांनी दिली. निवडणुकीसंदर्भात आमच्या नेतृत्वांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार आगामी महापालिका निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, त्यादृष्टीने निवडणूक तयारी सुरू केली आहे. गुणवत्तेच्या निकषावर उमेदवारीचे वाटप केले जाणार आहे.