येरवडा कारागृहाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 10:54 IST2018-07-07T10:52:32+5:302018-07-07T10:54:08+5:30
शिस्तीच्या बडग्यामुळे तुरुंगाधिकाऱ्यांवर केला होता गोळीबार

येरवडा कारागृहाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात पाच जणांना अटक
पुणे : कारागृहात शिस्तीचा बडगा दाखवल्याने संतापलेल्या आरोपींनी संगनमत करुन तुरुंगाधिकारी मोहन पाटील यांच्यावर गोळीबार करुन त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. निलेश संभाजी वाडकर, सुदर्शन संभाजी राक्षे, ओंकार चंद्रकांत बेनूसे, ऋषीकेश राजेश चव्हाण, आणि कुणाल कानडे अशी त्यांची नावे आहेत.
शिस्तप्रिय असलेले मोहन पाटील हे कारागृहात काम करत असताना अतिशय कडक वागत असत. निलेश वाडकर व त्याच्या साथीदारांची एका खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यावेळी पाटील यांच्या शिस्तीचा बडगा त्यांना सहन करावा लागला होता. त्या रागावून त्यांनी पाटील यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला. जामीनावर सुटून बाहेर आल्यावर त्यांनी पाटील हे कधी ये-जा करतात, याची रेकी करुन कट रचला. नेहमीप्रमाणे पाटील शुक्रवारी सकाळी जेल ओपनिंग ड्युटीसाठी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी भर रस्त्यात त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांचा नेम चुकल्याने ते थोडक्यात बचावले. पाटील यांनी हातातील छत्रीच्या सहाय्याने प्रतिकार केल्याने दोन्ही हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. शुक्रवारी सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या पार्किंगसमोर हा प्रकार घडला.
या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. हल्ला करणारे दोघे हल्लेखोर स्कूटरवरून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून एक पुंगळी आढळली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मिळालेल्या छायाचित्राच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.