Pune Rain: मावळातील पाच धरणे शंभरीच्या उंबरठ्यावर; पाण्याची चिंता मिटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 16:48 IST2023-07-28T16:47:59+5:302023-07-28T16:48:37+5:30
लवकरच ही धरणे १०० टक्के भरणार असल्याने मावळ व पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे...

Pune Rain: मावळातील पाच धरणे शंभरीच्या उंबरठ्यावर; पाण्याची चिंता मिटली
लोणावळा (पुणे) :लोणावळा शहर व मावळ तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील पाच धरणे शंभरीच्या जवळ पोहोचली आहेत. लवकरच ही धरणे १०० टक्के भरणार असल्याने मावळ व पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडची तहान भागविणारे पवना धरण शुक्रवारी सकाळपर्यंत ७८ टक्के पाणीसाठा झाला आहे. कासारसाई धरणात ८८.४८ टक्के, आंद्रा धरणात ७८.७१ टक्के, वडिवळे धरणात ८६.६० टक्के, टाटा कंपनीच्या लोणावळा धरणात ८५.१५ टक्के, लोणावळा शहर व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या वलवण धरणात ७०.५९ टक्के, शिरोटा धरणात ६१.७४ टक्के पाणीसाठा झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून लोणावळा शहरासह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे लोणावळा परिसरातील धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. महिनाभरापूवी पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने मावळ तालुक्यातील चित्र बदलले आहे. विशेषता मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडची तहान भागविणारे पवना धरणात शुक्रवारी सकाळपर्यंत ७८ टक्के पाणीसाठा झाला आहे. दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.