सरकार नियुक्त 'अवसायक'नेच गंडा घालण्याचा पहिलाच प्रकार; १०० कोटींहून अधिक मालमत्ता लाटल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 00:08 IST2020-12-01T23:58:44+5:302020-12-02T00:08:50+5:30
ज्याच्यावर लोकांना त्यांचे पैसे मिळवून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानेच गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर..

सरकार नियुक्त 'अवसायक'नेच गंडा घालण्याचा पहिलाच प्रकार; १०० कोटींहून अधिक मालमत्ता लाटल्याचा संशय
पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहाराने बुडालेल्या संस्थेतील मालमत्ता व तारण ठेवलेली मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करुन गुंतवणुकदार, ठेवीदारांना त्यांची देणी परत करण्यासाठी शासनाकडून अवसायकाची नेमणूक केली जाते. मात्र, येथे ज्याच्यावर लोकांना त्यांचे पैसे मिळवून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानेच गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा राज्यातील पहिलाच प्रकार असावा.
कंडारे याने सुनील झंवर, योगेश साकला, कुणाल शहा व इतरांना हाताशी धरुन मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकदारांची फसवणूक केली. त्यात आतापर्यंत मिळालेल्या कागदपत्रांनुसार कंडारे याने काही कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे दिसून येत आहे. अधिक तपासात हा आकडा १०० कोटी रुपयांहून पुढे जाण्याची शक्यता आहे.
चार महिला अधिकाऱ्यांचा पुढाकार
जळगावात गेली काही वर्षे गाजत असलेल्या याप्रकरणातील अवसायकानेच गेलेल्या फसवणुकीच्या अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्यातील तपासाची सर्व सुत्रे ही तीन महिला पोलीस अधिकारी सांभाळत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड आणि पिपंरी चिचंवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचा प्रमुख सहभाग आहे. त्याबरोबर आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांच्याकडे अटक केलेल्या आरोपीच्या तपासासाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कंडारेसह अन्य आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथक
या सर्व प्रकरणात जितेंद्र कंडारे हा मुख्य सुत्रधार आहे. यातील सर्व व्यवहार व कागदपत्रांची त्याला पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे त्याला व त्याच्या इतर साथीदारांचा पोलिसाचे स्वतंत्र पथक शोध घेत आहे.