Fire in Plastic warehouse in Handwadi | हंडेवाडीत प्लॉस्टिक गोदामाला आग 

हंडेवाडीत प्लॉस्टिक गोदामाला आग 

पुणे - पुणे शहरात मध्यरात्रीनंतर दोन ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या. हडपसरजवळील हंडेवाडी येथील एका प्लॅस्टिकच्या गोदामाला भीषण आग लागून त्यात गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले. वाघोली येथील मारुतीचे शोरुम रुमला आग लागून त्यात संपूर्ण शोरुम व आतील साहित्य जळून खाक झाले. 

शिवम प्लॉस्टिक असे या गोदामाचे नाव आहे. हंडेवाडी येथील होळकरवाडी रस्त्यावरील मोकळ्या जागेत हे गोदाम आहे. तेथे दोन रुम असून एका ठिकाणी तेथील कामगार रहातात. या गोदामात प्लॉस्टिकचे ड्रम, मग असे घरगुती वापरासाठी लागणारे प्लॉस्टिकचे साहित्य ठेवण्यात आले होते. 

अग्निशामक दलाला पहाटे २ वाजून १० मिनिटांनी या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाली.  हडपसर व कोंढवा फायर स्टेशनच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. तोपर्यंत आगीने ऊग्र स्वरुप धारण केले होते़ अग्निशामक दलाने चारही बाजूने पाणी मारुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा परिणाम होत नसल्याचे दिसून आल्यावर त्यांनी फोमचा मारा सुरु केला. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश आले. ही आग विझविण्यासाठी तब्बल १० फोमचे डब्बे वापरण्यात आले. तसेच अग्निशामक दलाचे  ५ बंब, पीएमआरडीएचा एक बंब, स्थानिक वॉटर टँकर यांची मदत घेण्यात आली. 

आगीत गोदामातील सर्व साहित्य तसेच गोदामाचे पत्रे संपूर्णपणे जळून खाक झाले. सकाळी साडेपाच वाजता आग संपूर्णपणे विझविण्यात आली. आगीमागचे नेमके कारण समजू शकले नाही, असे अग्निशामक दलाचे हडपसर स्टेशनचे प्रमुख गोरे यांनी सांगितले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fire in Plastic warehouse in Handwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.