पुण्यातील विविध भागांत फटाक्यांमुळे आगीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 03:25 IST2017-10-20T03:24:44+5:302017-10-20T03:25:04+5:30
दीपावलीच्या उत्सवामध्ये लक्ष्मीपूजनानंतर सुरू झालेल्या फटक्यांच्या आतषबाजीमुळे गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा या ४ तासांत आगीच्या १५ घटना घडल्या.

पुण्यातील विविध भागांत फटाक्यांमुळे आगीच्या घटना
पुणे : दीपावलीच्या उत्सवामध्ये लक्ष्मीपूजनानंतर सुरू झालेल्या फटक्यांच्या आतषबाजीमुळे गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा या ४ तासांत आगीच्या १५ घटना घडल्या. अग्निशामक दलाने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनांमध्ये तीन झाडांना, तर एक दुकान व घरांसह अन्य ठिकाणी आग लागली. लोहियानगर येथील नवघणे वखारीजवळ रात्री अकराच्या सुमारास आग लागली. तेथे अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
शहराच्या बाणेर, बिबवेवाडी, कात्रज, खराडी, पाषाण, कोथरूड, हडपसर यासह अनेक ठिकाणी फटक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडल्या. गुरुवारी सायंकाळनंतर भवानी पेठेतील अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षात संध्याकाळी साडेसात नंतर आग लागल्याचे कॉल येऊ लागले. कात्रज येथील शनिनगर भागामध्ये एका दुकानामध्ये फटाक्याची ठिणगी पडल्याने या दुकानाने पेट घेतला.
आगीचे स्वरुप वाढू लागताच याठिकाणी तीन बंब रवाना करण्यात आले. पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचे प्रयत्न दलाच्या जवानांनी सुरु केले होते. काही ठिकाणी झाडे पेटल्याचे, काही ठिकाणी घराला आग लागल्याचे कॉल रात्री आठनंतर सुरु झाले होते.