हिंजवडी : हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स या ‘आयटी’ कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला (टेम्पो ट्रॅव्हलर) अचानक आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले. पुढील बाजूस बसलेले कर्मचारी आणि चालक पेटत्या बसमधून बाहेर पडले, मात्र मागील दरवाजा उघडला न गेल्याने अडकून पडलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. फेज एकमधील विप्रो सर्कलजवळ बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.या दुर्घटनेत सुभाष सुरेश भोसले (वय ४२, रा. वारजे), शंकर शिंदे (५८, रा. नऱ्हे), गुरुदास लोकरे (४०, रा. हनुमाननगर, कोथरूड), राजू चव्हाण (४०, वडगाव धायरी) यांचा मृत्यू झाला तर, जनार्दन हुंबर्डेकर (चालक, ५७, रा. वारजे), संदीप शिंदे (३७, रा. नऱ्हे), विश्वनाथ जोरी (५२, रा. कोथरूड), विश्वास लक्ष्मण खानविलकर (पुणे), प्रवीण निकम (३८), चंद्रकांत मलजी (५२, रा. दोघेही कात्रज) जखमी झाले. विश्वास कृष्णराव गोडसे, मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे, प्रदीप बाबुराव राऊत बसमधून सुखरूप बाहेर पडले.बुधवारी (दि. १९) सकाळी आयटी पार्क फेज दोनमधील व्योम ग्राफिक्स (तिरुमाला इंडस्ट्रिअल इस्टेट) कंपनीचे बारा कर्मचारी घेऊन मिनी बस (एमएच १४ सीडब्लू ३५४८) पुण्याहून हिंजवडी आयटी पार्ककडे येत होती. फेज एकमधील विप्रो सर्कलपासून पुढे आल्यावर सकाळी आठच्या सुमारास चालकाच्या पायाखालील बाजूस अचानक आग लागली. चालक आणि पुढील बाजूस बसलेले कर्मचारी खाली उतरले, मात्र दरवाजा वेळेवर उघडला गेला नसल्याने मागील बाजूस असणाऱ्या चौघांचा होरपळून मृत्यू झाला आणि सहाजण जखमी झाले. जखमींना पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे.केवळ दोन मिनिटांचे अंतर...कंपनीपासून दोन मिनिटांच्या अंतरावर असतानाच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बसचालकाच्या पायाखाली अचानक आग लागल्याचे लक्षात येताच बस दुभाजकाच्या बाजूला उभी करून, चालक आणि समोर बसलेले कर्मचारी तातडीने बाहेर पडले. बसने पेट घेतल्याचे दिसताच परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी. बसच्या मागील दरवाजाच्या यंत्रणेत काही दोष होता का, याचाही तपास सुरू आहे. - कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी.