पुणे : कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या सदनिकेत रविवारी दुपारी आग लागली. आगीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाने दिली. वृंदा संगवार (६५) असे मृत महिलेचे नाव आहे.
एनआयबीएम रस्त्यावरील सनफ्लाॅवर आणि सनश्री सोसायटी आहे. रविवारी (दि. ९) दुपारी सोसायटीतील एका सदनिकेत आग लागली. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. तेथील रहिवासी विजय कलढोणकर यांनी पोलिसांना सांगितल्यानुसार, देवाला लावलेल्या दिव्यामुळे पडद्याला आग लागली, त्यातून एसीचा कॉम्प्रेसर फुटल्याने ही घटना घडली. यावेळी मनोज बोरकर (७५) हे जखमी झाले असून, आग भडकल्याने सदनिकेत असलेल्या वृंदा यांना बाहेर पडता आले नाही. आगीत गंभीर होरपळलेल्या महिलेला जवानांनी बाहेर काढले. गंभीर होरपळलेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.