पुण्यातील स्वारगेट येथील प्रीती रेस्टॉरंटला लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 12:23 IST2017-10-09T12:23:18+5:302017-10-09T12:23:38+5:30
स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चित्रपटगृह शेजारील प्रीती रेस्टॉरंटला आग लागून यात हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

पुण्यातील स्वारगेट येथील प्रीती रेस्टॉरंटला लागली आग
पुणे : स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चित्रपटगृह शेजारील प्रीती रेस्टॉरंटला आग लागून यात हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाला काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.
लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाशेजारील इमारत तळमजल्याला प्रीती रेस्टॉरंट आहे. आग लागली तेव्हा ते बंद होते. या रेस्टॉरंटमधील कामगार मागील बाजूला राहतात. त्यांनी रेस्टॉरंटमधून धूर येत असल्याचे पाहून अग्निशमन दलाला याची माहिती तातडीनं कळवली. माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
रेस्टॉरंट बंद असल्याने आत मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. या घटनेत रेस्टॉरंटमधील पोट माळा संपूर्णपणे पेटला होता. आग अन्य ठिकाणी पसरू नये, याची काळजी घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी पाठीमागील खिडकी व पुढील खडकीतून पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत रेस्टॉरंटमधील पोटमाळ्यावरील टीव्ही, फ्रिज व सर्व फर्निचर जळून खाक झाले आहे.