कोरोना लसीच्या दोन भारतीय उत्पादकांमधला विस्तव विझला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST2021-01-08T04:28:06+5:302021-01-08T04:28:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने संयुक्त निवेदन ...

A fire broke out between two Indian manufacturers of corona vaccine | कोरोना लसीच्या दोन भारतीय उत्पादकांमधला विस्तव विझला

कोरोना लसीच्या दोन भारतीय उत्पादकांमधला विस्तव विझला

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने संयुक्त निवेदन काढत पडदा टाकला आहे. भारतासह जगातील नागरिकांचे प्राण वाचविण्याची क्षमता दोन्ही लसींमध्ये असून लोकांना सुरक्षित, परिणामकारक व उच्च दर्जाची लस मिळण्यासाठी त्याचे उत्पादन, पुरवठा व वितरणावर आमचा अधिक भर राहील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

भारतीय औषध महासंचालकांनी सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड व भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. त्यानंतर कोव्हॅक्सिनच्या मान्यतेवरून वाद निर्माण झाला. ‘सिरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनीही कोव्हॅक्सिनच्या मान्यतेवर थेट भाष्य न केल्याने संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारत बायोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा ईला यांनी पत्रकार परिषद घेऊन टीकेला उत्तर दिले होते. त्यामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात होते. त्यावरून पूनावाला व डॉ. ईला यांनी संयुक्त निवेदन प्रसिध्द करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आम्ही एकत्र असल्याचे सांगितले आहे.

‘आज कोविड लसीची निर्मिती, उत्पादन व वितरणाबाबत चर्चा करण्यात आली. भारतासह जगातील लोकांचे जीव वाचविणे, हे आमच्यासमोरील महत्त्वाचे काम आहे. लोकांचे जीव वाचविणे आणि आर्थिक स्थिती पूर्ववत करण्याची क्षमता लशींमध्ये आहे. दोन्ही लशींना आपत्कालीन वापरासाठी भारतात परवानगी मिळाली आहे. आता आमचा भर उत्पादन, पुरवठा व वितरणावर राहील. जेणेकरून नागरिकांना उच्च दर्जाची, सुरक्षित व परिणामकारक लस मिळेल. भारतासह जगाला सहजपणे लस उपलब्ध करून देणे, ही आमची जबाबदारी असून त्यावरच संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. नियोजनानुसार लस निर्मिती सुरू राहील,’ असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

चौकट

“महामारीशी आपण सर्वजण एकत्रपणे लढा देत आहोत. या निवेदनामुळे सर्व संभ्रम व विसंवाद दूर होतील, असे ट्विट करून अदर पूनावाला यांनी संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

--------

Web Title: A fire broke out between two Indian manufacturers of corona vaccine