'गुगल अॅप'वरुन आता दंडाची रक्कम भरता येणार; पुणे पोलीस दल 'कॅशलेस' होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 21:25 IST2021-06-03T21:23:21+5:302021-06-03T21:25:44+5:30
येत्या २ ते ३ दिवसात ही योजना प्रत्यक्षात येणार....

'गुगल अॅप'वरुन आता दंडाची रक्कम भरता येणार; पुणे पोलीस दल 'कॅशलेस' होणार
पुणे : संचारबंदीचा भंग केल्याबद्दल सध्या शहरात रस्त्या रस्त्यांवर नागरिकांची अडवणूक होतेय. महत्वाचे कारण असतानाही पोलीस सोडत नाही. उलट दंडाची पावती फाडायला सांगतात. त्यात रोख पैसे नसतील तर, तेथेच असलेल्या पोलीस मित्राच्या वैयक्तिक खात्यात गुगल पे करायला सांगतात. त्यामुळे आपल्याला पावती मिळाली तरी हा पैसा स्थानिक पोलिसांच्या खिशात जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या कानावरही अशा तक्रारी आल्या असून त्यावर पोलिसांनीगुगल पे व अन्य अॅपद्वारे होणार्या व्यवहारासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येणार आहे.
शहरात जवळपास ९६ ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली असून तेथे वाहनांची तपासणी केली जात आहे. या ठिकाणी पोलीस अडवणूक करतात. महत्वाचे काम असले तरी सोडत नाही. जबरदस्तीने ५०० रुपयांची पावती करायला सांगतात. पैसे नाहीत असे सांगितले तर, खासगी व्यक्तीला गुगल पे करायला सांगत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. टारगेट पूर्ण करण्यासाठी कारण नसताना छोट्या कारणासाठी पावत्या फाडल्या जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी सागिंतले की, अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. संबंधितांना पावती दिली जात असेल, तर त्याच्या पैशांचा भरणा पोलिसांच्या खात्यात करावा लागतो. ही तेथील त्या वेळची एडजेस्टमेंट असेल. त्याला भ्रष्टाचार म्हणता येणार नाही. पण तरीही ती अनियमितता आहे.
या तक्रारींची दखल घेऊन अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवी सिस्टिम तयार करण्यात येत आहे. त्यानुसार भांडारकर रोडवरील एचडीएफसीच्या शाखेत स्वतंत्र खाते उघडण्यात येणार असून पुणे पोलीस दलातील सर्व ३२ पोलीस ठाण्यांच्या नावाने स्वतंत्र कोड असणार आहे. त्यामुळे कोणत्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत किती दंड वसूल करण्यात आला. त्याची माहिती प्रत्येक दिवशी सायंकाळी समजू शकणार आहे. त्यामुळे लोकांना खासगी व्यक्तीच्या नावावर पैसे पाठवावे लागणार नाही. येत्या २ ते ३ दिवसात ही योजना प्रत्यक्षात येणार आहे.
.....
वाहतूक शाखेमध्ये ज्याप्रमाणे सर्व प्रकारच्या दंडात्मक कारवाईसाठी कॅशलेस व्यवस्था करण्यात आली आहे. तशीच व्यवस्था या दंडवसुलीसाठी करण्यात येणार असून येत्या २ ते ३ दिवसात ही योजना आकाराला येणार आहे.
डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त.
़़़़़़़
आईचा अपघात झाल्याने रविवारी नांदेड सिटीतून कासारवाडी येथे निघालो होतो. कारमध्ये मी व पत्नी दोघेच होतो. राजाराम पुलाच्या कोपऱ्यावर पोलिसांनी अडविले. खूप सांगितले, तरी ते ऐकायला तयार नाही. पुरावा मागत होते.आता नुकताच अपघात झाल्याचे समजल्यानंतर पुरावा कोठून आणणार. २ हजार रुपये दंड मागितला. गयावया केली तेव्हा ३०० रुपये घेतले. पावती न देता घरी परत जायला सांगितले. ही कसली अडवणूक, लॉकडाऊनचा आधार घेत कसली वसुल सुरु आहे?
एक नागरिक.