अंकिता कोठारे
पुणे : आर्थिक गरिबी, साधनांचा अभाव... या सगळ्या अडचणींना छातीवर झेलत, कचरावेचकाच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळवत आश्चर्यचकित केले. विशेष म्हणजे, तिने शिकवणी वर्ग न करता, केवळ शाळेच्या माध्यमातून आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले.
श्रुती शिवाजी जाधव ही कचरावेचक शिवाजी विठ्ठल जाधव यांची मुलगी. तिने मॉडर्न कॉलेजमधून कला शाखेतून ८२.१७ टक्के गुण मिळवले. तिचे वडील भोसलेनगर येथे काम करतात. आई स्वच्छ संस्थेत सर्व्हेचे काम पाहते. आई-वडील दोघेही दिवसभर कष्ट करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. अशा परिस्थितीत खाजगी क्लासेस लावायची परिस्थिती नाही म्हणून ७ ते ८ तास अभ्यास करत श्रुतीने हे यश संपादन केले. श्रुती म्हणते, 'वडिलांनी मला शिकवणी लावली नाही. पण, मी ठरवलं होतं त्यांच्या कष्टाला मी हरवू देणार नाही.' श्रुतीने मिळवलेले यश म्हणजे केवळ गुणांचे प्रमाणपत्र नाही, तर सामाजिक अडथळ्यांवर मिळवलेले उत्तर असल्याची भावना तिच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.
इकॉनॉमिकमध्ये मिळवायचीय डॉक्टरेट
दहावीत कमी गुण मिळाले म्हणून निराश होते, मात्र तेव्हाच ठरवलं की, बारावीत यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण व्हायचे आणि त्यानुसार अकरावीपासून मेहनत घेतली. कोणतेही क्लासेस न करता स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून पुस्तके, विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि पेपर सोडवायला मिळाले या सर्वांची खूप मदत झाली. महाविद्यालयात शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवत तो अभ्यास वारंवार केला आणि ८२.१७ टक्के मिळाले. आता मला इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स करायचे असून, इकॉनॉमिक्सची प्रोफेसर बनायची इच्छा असल्याचे श्रुतीने सांगितले.