पुणे: शहरात मागील काही दिवसांपासून गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळेबाबत निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. मानाच्या पाच गणपतींच्या अगोदरच सकाळी सात वाजता मिरवणुकीला सुरुवात करावी, असा आग्रह काही मंडळांचा होता. यामुळे तणावाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व आमदार हेमंत रासने यांच्या मध्यस्थीनंतर अखेर सर्वानुमते तोडगा निघाला असून, पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्किट हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, मानाच्या पाचही गणपती मंडळांचे अध्यक्ष, तसेच इतर मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चर्चेनंतर सकाळी साडेनऊ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. मिरवणूक वेळेत पार पडावी, यासाठी काही महत्त्वाचे नियम ठरवण्यात आले आहेत. स्थिर वादन होणार नाही, मिरवणूक थांबणार नाही आणि दोन मंडळांमधील अंतर व्यवस्थित राखले जाईल. विद्युत रोषणाई असलेल्या मंडळांना सायंकाळी मार्ग मिळेल, अशी विशेष तरतूदही करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूकीबाबात वाद मिटल्यामुळे पुणेकरांना आता परंपरेप्रमाणेच भव्य, पारंपरिक आणि शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक अनुभवायला मिळणार आहे. प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि मंडळांच्या समन्वयातून यंदाची मिरवणूक वेळेत आणि उत्साहात पार पडणार असल्याचा विश्वास मंडळांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, विसर्जन मिरवणुकीबाबत मतभेद होते. मात्र, बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन सकाळी साडेनऊ वाजता मिरवणूक सुरू करण्याचे ठरले असून, मिरवणूक वेळेत संपविण्याची जबाबदारी प्रत्येक मंडळावर असणार आहे.
आमदार हेमंत रासने म्हणाले, मानाचे गणपती सकाळी साडेनऊ वाजता विसर्जन मिरवणूक सुरू करतील. मिरवणूक शिस्तबद्ध राहील, थांबणार नाही आणि प्रत्येक मंडळ वेळ कमी करण्यासाठी कटिबद्ध असतील.
गुरुजी तालीम गणपतीचे प्रवीण परदेशी म्हणाले, राज्य सरकारने यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहात मिरवणूक पार पडेल. वेळ कमी करण्यासाठी सर्व मंडळे प्रयत्नशील असतील.
तांबडी जोगेश्वरी गणपतीचे प्रशांत टिकार म्हणाले, निर्णय स्वागतार्ह आहे. मिरवणुकीचा वेळ नक्कीच कमी होणार असून आम्ही यासाठी प्रयत्न करणार आहोत.
तुळशीबाग गणपतीचे विनायक कदम म्हणाले, सकाळी साडेनऊला मिरवणूक सुरू होईल आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रत्येक मंडळ प्रयत्नशील असेल.
केसरी वाडा गणपतीचे अनिल सपकाळ यांनी सांगितले, बैठकीतील निर्णय स्वागतार्ह असून मिरवणूक वेळेत संपवण्याचा आमचा कटाक्ष असेल.
रामेश्वर चौक मंडळाचे सुरेश जैन म्हणाले, वाद मिटल्यामुळे सर्व मंडळांना न्याय मिळाला आहे. विद्युत रोषणाईच्या मंडळांचा वेळ वाया जाणार नाही.