Lokmat Impact: पुण्यातील ॲंटिजन टेस्टिंग किट घाेटाळाप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: November 24, 2023 09:54 AM2023-11-24T09:54:18+5:302023-11-24T09:56:25+5:30

हा घाेटाळा सर्वप्रथम ‘लाेकमत’ने उघडकीस आणला होता...

Finally, a case has been filed in connection with the theft of antigen testing kit in Pune | Lokmat Impact: पुण्यातील ॲंटिजन टेस्टिंग किट घाेटाळाप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

Lokmat Impact: पुण्यातील ॲंटिजन टेस्टिंग किट घाेटाळाप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

पुणे : कोरोना काळात घडलेल्या वारजे येथील महापालिकेच्या अरविंद बारटक्के रुग्णालयातील ॲंटिजेन कीट तपासणी घाेटाळा प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. तत्कालीन आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा तारडे, तत्कालीन कंत्राटी तत्त्वावरील स्टॅब सेंटरचे प्रमुख डॉ. हृषिकेश गारडी यांच्याविरुद्ध फसवणूक व इतर कलमाखाली हा गुन्हा दाखल झाला आहे. सर्वात प्रथम लोकमत ने हा घोटाळा उघडकीस आणला होता. 

याबाबत तक्रारदार डाॅ. सतीश काेळसुरे यांनी ॲड. नितीन नागरगाेजे यांच्यामार्फत या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली हाेती. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश सी. एस. पाटील यांनी वारजे ठाण्याच्या पाेलिस निरीक्षकांना फाैजदारी प्रक्रिया कायद्याच्या कलम १५६ (3) प्रमाणे सखाेल तपास करून हा अहवाल सादर करावा, असेही आदेश दिले होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. 

 भारतीय दंडविधान संहिता १८६० चे कलम ४२०, ४०६, ४०९, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१ आणि ३४ व फाैजदारी संहिताचे कलम १५६ (3) प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला आहे. 

 काय आहे गुन्हा? :

कोरोनाकाळात शासनाकडून महापालिकेला कोरोना तपासणीसाठी मिळालेल्या 'रॅपिड अँटिजेन किट' प्रकरणात मोठा घोटाळा उघडकीस आला हाेता. वारजे येथील महापालिकेच्या अरविंद बारटक्के दवाखान्यातील स्वॅब सेंटरवर आलेल्या साडेअठरा हजार तपासणी किटपैकी ६० ते ८० टक्के किट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री करून त्याजागी तब्बल ११ हजारांहून अधिक बोगस रुग्णांच्या नोंदी केल्याचा प्रकार घडला तसेच त्यांना एसएमएस जाऊ नये म्हणून रुग्णांऐवजी सेंटरवरील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे नंबर नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला हाेता. या घोटाळ्यातून तब्बल 70 ते 80 लाख रुपये या केंद्रावरील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी लाटले असल्याचे म्हटले आहे.

‘लाेकमत’ने आणला घाेटाळा उघडकीस :

हा घाेटाळा सर्वप्रथम ‘लाेकमत’ने उघडकीस आणला. त्यानंतर या प्रकरणात पुढे महापालिकेने चाैकशी समिती बसवून चाैकशी केली हाेती. पुढे याच प्रकरणामुळे तत्कालीन आराेग्यप्रमुख डाॅ. आशिष भारती यांनाही पायउतार व्हावे लागले हाेते.

Web Title: Finally, a case has been filed in connection with the theft of antigen testing kit in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.