few salary pay of employee due to ST's income decline | एसटीचे उत्पन्न घटल्याने अंशत: वेतन 
एसटीचे उत्पन्न घटल्याने अंशत: वेतन 

ठळक मुद्देएसटी महामंडळाचे स्पष्टीकरण : चर्चांना पूर्णविरामठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या विभागांतील सर्व कर्मचाऱ्यांना अंशत: वेतन

पुणे : मागील दोन महिन्यांत अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या विभागांतील सर्व कर्मचाऱ्यांना अंशत: वेतन दिले. तसेच इतर काही विभागांतील एक-दोन आगारांमध्येही अंशत: वेतन दिले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना उर्वरित वेतन तातडीने देण्यात आल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनकपातीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 
एसटीतील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ७ तारखेला दिले जाते. मात्र, नोव्हेंबर महिन्यातील वेतन अनेक कर्मचाऱ्यां ना कमी मिळाले. एसटीची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. कर्मचारी संघटनांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली. मात्र, महामंडळाने ‘ही कपात नसून वेतनासाठी पुरेसे पैसे नसल्याने अंशत: वेतन दिल्याचे’ स्पष्ट केले आहे. एसटीचे ३१ विभागांतर्गत एकूण २५० आगार आहेत. 
या आगारांतील कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला वेतन देण्यासाठी प्रत्येक आगारामध्ये महिन्याच्या १ तारखेपासून प्रवासी उत्पन्न स्थानिक पातळीवर संकलित करण्यात येते.  वेतनासाठी मध्यवर्ती कार्यालयातूनही दरमहा ५० टक्के निधी विभागाला वितरित केला जातो. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाते. 
......
प्रवासी संख्येत मोठी घट
ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी पावसामुळे प्रवासीसंख्येत मोठी घट झाली आहे. त्याचा एसटीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे. त्याचबरोबर १ डिसेंबरपासून काही विभागांत प्रवासी उत्पन्नामध्ये घट झाली. त्यामुळे या विभागांना वेतनासाठी आवश्यक रक्कम उपलब्ध होऊ श्कली नाही. त्यामध्ये ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या विभागांतील सर्व कर्मचाºयांना अंशत: वेतन देण्यात आले. तर नांदेड, परभणी, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, औरंगाबाद, अकोला या विभागांतील एक-दोन आगारांध्येही अंशत: वेतन द्यावे लागले. या विभागांना महामंडळाच्या मुख्यालयातून तातडीने रक्कम उपलब्ध करून देण्यात आली असून संबंधित कर्मचाºयांचे उर्वरित वेतन देण्यात आल्याची माहिती एसटीच्या जनसंपर्क विभागाने दिली. 

Web Title: few salary pay of employee due to ST's income decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.