बारामती जिरायती पट्टा नापेर राहण्याची भीती

By Admin | Updated: June 22, 2016 00:53 IST2016-06-22T00:53:46+5:302016-06-22T00:53:46+5:30

जून महिना संपत आला. रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्रही संपत आले. मात्र, बारामतीचा जिरायतीचा मोठा पट्टा आजही कोरडाठाक आहे.

Fear of staying in Baramati Giriati Patta Naper | बारामती जिरायती पट्टा नापेर राहण्याची भीती

बारामती जिरायती पट्टा नापेर राहण्याची भीती

लोणी भापकर : जून महिना संपत आला. रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्रही संपत आले. मात्र, बारामतीचा जिरायतीचा मोठा पट्टा आजही कोरडाठाक आहे. पावसाने अशीच हुलकावणी दिली, तर येथील जिरायती पट्टा सलग चौथ्या वर्षी खरीप हंगामात नापेर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्या दिवसभर ढगाळ तर कधी कडक ऊन, वेगाने वाहणारे वारे, अशा वातावरणात येथील बळीराजा मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे टक लावून बसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, ऐन पावसाळ्यात बारामतीच्या या भल्यामोठ्या कोरडवाहू भागात जवळपास ५० टँकरने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. त्यातच जवळचा चारा संपल्याने दारातील जनावरांना खायला काय घालायचे, अशा विवंचनेत हा भाग पर्जन्यराजाला साकडे घालताना दिसत आहे. खरीप हंगामात या भागात बाजरी, कांदा, सूर्यफूल, मका, मूग, मटकी ही पिके मोठ्या क्षेत्रावर घेतली जातात. याबरोबरच पाऊसपाणी असेल तर चारापिकांसह भाजीपाला, फळबागाखालील क्षेत्रात वाढ होत असते. मात्र मागील चार वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत असल्याने खरीप हाती लागलेला नाही. याही वर्षी रोहिणी आणि मृग नक्षत्रातील पाऊस सर्वदूर झालेला नाही. त्यामुळे ओढे, नाले, पाझर तलाव आदी पाण्याचे स्रोत कोरडेठाक आहेत. दरम्यान, शिल्लक चारा संपला आहे व बाहेरून चारा आणणे परवडत नाही आणि बाजारात किमत नाही त्यामुळे दारातील जित्राबांचे करायचे काय या विवंचनेत हा भाग आभाळाकडे टक लावून पर्जन्यराजाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)

५० टँकर : रब्बीचा तालुका म्हणून ओळख असलेल्या बारामती तालुक्यातील उत्तर पश्चिम भागातील मोरगावसह बावीस तर सुपे परगण्यातील चोवीस गावे सध्या पाणी, चारा व एकूणच आर्थिक टंचाईचा सामना करीत आहेत. अगदी जून संपत आला तरी शासनाचे ३४ तर खासगी संस्थांचे १६ असे जवळपास ५० टँकर या भागाला पिण्याचे पाणी पुरवित आहेत.

Web Title: Fear of staying in Baramati Giriati Patta Naper