जुन्या मुंबई- पुणे मार्गावर भीषण अपघात; सिमेंट मिक्सरच्या धडकेने दुचाकीवरील तरुणी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 10:12 IST2023-01-16T10:11:23+5:302023-01-16T10:12:57+5:30
ही घटना जुन्या पुणे- मुंबई रोडवरील खडकीतील चर्च चौकात शनिवारी दुपारी दाेन वाजता घडली...

जुन्या मुंबई- पुणे मार्गावर भीषण अपघात; सिमेंट मिक्सरच्या धडकेने दुचाकीवरील तरुणी ठार
पुणे : सिमेंट मिक्सरच्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली. त्यात सहप्रवासी तरुणी उजव्या बाजूला पडल्याने तिच्या अंगावरून कंटेनरचे चाक जाऊन त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जुन्या पुणे- मुंबई रोडवरील खडकीतील चर्च चौकात शनिवारी दुपारी दाेन वाजता घडली.
मधुरा शैलेश मिश्रा (वय २१, रा. निगडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक रवी देवानंद नाडे (रा. वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मधुराचा मित्र मंदार तांबे याने फिर्याद दिली. मंदार आणि मधुरा कामानिमित्त पुण्यात आले होते. पुण्यातील काम आटोपून ते दुचाकीवरुन जुन्या मुंबई- पुणे रस्त्यावरून निगडीकडे निघाले होते. त्याचवेळी खडकीतील चर्च चौकात पाठीमागून आलेल्या सिमेंटच्या मिक्सरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. मंदार हा गाडीच्या डाव्या बाजूला तर मधुरा उजव्या बाजूला पडली. त्यामुळे मिक्सरचे डावे चाक तिच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक मालोजी कांबळे तपास करीत आहेत.