Fastag that loot tag? The toll goes twice on the highway | फास्टॅग की लूट टॅग?; पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दोनवेळा जातोय टोल

फास्टॅग की लूट टॅग?; पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दोनवेळा जातोय टोल

ठळक मुद्दे रविवारपासून फास्टॅग बंधनकारक फास्टॅगद्वारे टोल भरल्यानंतर पुढील नाक्यावरही आपोआप पैसे जात असल्याच्या तक्रारी

पुणे : टोल नाक्यांवरील रांगा कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढावा यासाठी सुरू करण्यात आलेली फास्टॅग यंत्रणा अजूनही धीम्या गतीनेच सुरू आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर काही वाहनचालकांचे फास्टॅग स्कॅन होत नसल्याच्या कारणास्तव त्यांच्याकडून रोखीने टोलवसुली केली जात आहे. तर त्याच वाहन चालकांना पुढील टोलनाक्यावर फास्टॅगच्या माध्यमातून टोल कट झाल्याचा अनुभव येत आहे. तसेच एकदा फास्टॅगद्वारे टोल भरल्यानंतर पुढील नाक्यावरही आपोआप पैसे जात असल्याच्या तक्रारीही वाहनचालकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे हा फास्टॅग काही वाहनचालकांसाठी ‘लुट’ टॅग ठरत आहे.
टोलनाक्यांवर टोलेचे पैसे देण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे वेळ व इंधनही वाया जाते. तसेच प्रदुषणातही वाढत होते. यापार्श्वभुमीवर टोलनाक्यांवरील वेळ कमी करण्यासाठी केंद्र सरकारने फास्टॅग यंत्रणेची अंमलबजावणी सुरू केली आहे. रविवार (दि. १५) पासून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गासह सर्व राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. यापुर्वी दि. १ डिसेंबरपासून याची सुरूवात केली जाणार होती. त्यासाठी मागील काही महिन्यांपासूनच तयारी सुरू आहे. द्रुतगर्ती व राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर ही यंंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामाध्यमातून टोलवसुलीही सुरू आहे. रविवारपासून फास्टॅग बंधनकारक असला तरी अद्यापही ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याचा अनुभव वाहनचालकांना येत आहे. 
अनेक वाहनचालकांनी टिष्ट्वटरच्या माध्यमातून आपले अनुभव सांगत संताप व्यक्त केला आहे. संजीव जंजीरे यांनी द्रुतगती मार्गावर रोखीने टोल भरल्यानंतर काही वेळात त्यांच्या फास्टॅग खात्यातूनही पैसे कट झाले. ही यंत्रणा अजूनही सक्षम नाही. तसेच तक्रार करण्याचीही व्यवस्था नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. ‘फास्टॅग खात्यातून टोलसाठी अवाजवी पैसे गेले. तळेगाव व खालापुर या दोन्ही टोलनाक्यांवर प्रत्येकी १७३ रुपयांचा टोल कट झाला. याबाबत सात दिवसांपुर्वी तक्रार देऊनही पैसे परत मिळाले नाहीत.’ निखील कपुर यांनाही असाच अनुभव आला आहे. द्रुतगती मार्गावर टोलसाठी वाढीव पैसे घेतले जात आहेत. टोलसाठी २३० ऐवजी ३४६ रुपये द्यावे लागले, अशी तक्रार त्यांनी केली आहे. ‘फास्टॅगचे पाऊल चांगले आहे. पण शनिवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर फास्टॅग लेन असे लिहिल्याचे केल्याचे दिसले नाही. तसेच ९० टक्के वाहने विना फास्टॅगची जात होती,’ असे निनाद यांनी म्हटले आहे. 
--------------------

मुंबईकडे जाताना तळेगाव टोलनाक्यावर काही वाहनचालकांना फास्टॅग सुरू नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडून एकुण २३० रुपये रोखीने घेतले गेले. पण ते पुढे गेल्यानंतर काही वेळातच त्यांना फास्टॅग खात्यातून १७३ रुपये गेल्याचा संदेश आला. पुढे खालापुर टोलनाक्यावरून वाहन गेल्यानंतर पुन्हा १७३ रुपये कट झाल्याचा अनुभव काही वाहनचालकांना आला. याबाबत तक्रार केल्यानंतरही लवकर पैसे परत मिळत नाहीत, अशी तक्रारही चालकांनी केली आहे. रविवारपासून फास्टॅग बंधनकारक असल्याने या तक्रारींमध्ये वाढ होण्याचीच शक्यता अधिक आहे. दरम्यान, याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अधिकाºयांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fastag that loot tag? The toll goes twice on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.