Fast tag scanning problem on mumbai pune expressway toll naka | 'फास्ट टॅग' ठरतोय 'स्लो-टॅग'! मुंबई-पुणे महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर गोंधळामुळे रांगा

'फास्ट टॅग' ठरतोय 'स्लो-टॅग'! मुंबई-पुणे महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर गोंधळामुळे रांगा

शिरगाव (जि. पुणे) : शनिवार, रविवारची सुटी असल्याने मावळ आणि लोणावळा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे सायंकाळी द्रूतगती मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यातच उर्से टोल नाक्यावर फास्ट टॅग स्कॅन होण्यात अडचणी आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 
राज्यातील सर्व टोल नाक्यावर फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. अनेक वाहनांवर फास्ट टॅग नसल्यामुळे तसेच ज्या वाहनांवर फास्ट टॅग होते, पण ते स्कॅन होत नसल्यामुळे सोमाटणे आणि उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सोमाटणे फाटा चौकातदेखील वाहतूककोंडी झाली होती. यामुळे वाहन चालकांना मनस्ताप झाला.

लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे तसेच कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे नागरिक बिनधास्त वावरत आहेत. मुक्त फिरण्यासाठी मावळ पर्यटकांना नेहमीच खुणावते. पुणे व पिंपरीमधून मावळमध्ये फिरायला येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक पर्यटनस्थळे मावळमध्ये आहेत.मावळचे प्रवेशद्वार असलेल्या सोमाटणे फाटा येथे टोल नाक्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. सायंकाळी पुण्याच्या दिशेने जाणा-या वाहनांची रांग ही सोमाटणे फाटा येथील मुख्य चौकापर्यंत गेली होती.

मावळ तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे असल्यामुळे प्रत्येक शनिवार व रविवारी महामार्गावर वाहनांची गर्दी असते. रविवारच्या सुटीच्या दिवशी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. सोमाटणे आणि उर्से टोलनाक्यावर टोल बूथमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच, कर्मचारीही वाढविण्यात आले आहेत. तरीही वाहनांच्या रांगा कमी झाल्या नाहीत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fast tag scanning problem on mumbai pune expressway toll naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.