शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करणार, पण गैरफायदा घेऊ नये; अजित पवारांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 10:38 IST2025-01-27T10:37:46+5:302025-01-27T10:38:04+5:30

शेतकऱ्यांकरिता आगामी अर्थसंकल्पात शक्य तितकी मदत करण्यात येईल, असा शब्द अजित पवारांनी दिला आहे.

Farmers should think like scientists says ncp leader and dycm Ajit Pawar | शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करणार, पण गैरफायदा घेऊ नये; अजित पवारांचं आवाहन

शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करणार, पण गैरफायदा घेऊ नये; अजित पवारांचं आवाहन

NCP Ajit Pawar: शेतीत प्रगती साधण्याच्या दृष्टीने शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे, शेतकरी संशोधक असला पाहिजे, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५ च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. 

"आपल्या कृषी प्रधान देशात कृषी विकासाला प्रचंड क्षमता आहे. कृषी क्षेत्रात शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला वाव देऊन अनेक संधीचा लाभ देता येऊ शकतो. शेतीतून मिळणारे उत्पादन खाद्यासोबतच देशाच्या उद्योग व्यवसाय प्रक्रियेत वापरले जाते. आता जगामध्ये जागतिक हवामान बदलासह शेतीसमोर अनेक आव्हाने असून त्यामुळे कृषी मालाचा पुरवठा कमी होऊ शकतो. निविष्ठा खर्चामुळे शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही. लांब आणि खंडीत जमीन असल्यामुळे उत्पादकता कमी होते. यावर मात करून शेतकऱ्यांना पुढे जाणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकरिता आगामी अर्थसंकल्पात शक्य तितकी मदत करण्यात येईल. सरकार जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असताना गैरफायदाही घेण्याचा प्रकार होऊ नये," असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अतिशय नेत्रदीपक कृषी प्रदर्शन, जनावरे, घोडेबाजार व डॉग शो आयोजित केला. यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होते. त्यादृष्टीने नवीन माहिती, तंत्रज्ञान यासोबतच जातिवंत जनावरांची ओळख इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे, ही समाधानाची बाब आहे. या बाजार समितीला शेतकरी निवास उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
 
दरम्यान, "या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने, आधुनिक शेतीची साधने, महिला बचत गटांची उत्पादने, गृहोपयोगी वस्तू पाहायला मिळाल्या. पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडेबाजार या ठिकाणी पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील देशातील दोनशे प्रकारची जातीवंत घोडे वैशिष्ट्यपूर्ण डॉग शो, खिलार जनावरे, बैल, गाई या ठिकाणी पाहायला मिळाले. इंदापूर तालुक्यातील शेतकरी डाळिंब, केळी, पेरू, द्राक्षे, ड्रॅगन फ्रुट आदी फळबागांत अग्रेसर आहेत. येथील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे द्राक्षाचे  वाण तयार केले आहेत. हे पाहता शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, पिकाला माफक पाणी देण्याची पद्धत, ऊसाचे उत्पादन वाढविणे, चांगल्या प्रकारची फुले, फळे कशी पिकवावीत याबाबतचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. आपल्याकडे शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, इतर राज्यातील, देशातील तंत्रज्ञान आणावे लागेल," अशी सूचनाही अजित पवारांनी यावेळी केली.

Web Title: Farmers should think like scientists says ncp leader and dycm Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.