farmers have no place to BAZAAR In Rajgurunagar market | राजगुरुनगर बाजारात शेतकऱ्यांनाच मिळेना जागा
राजगुरुनगर बाजारात शेतकऱ्यांनाच मिळेना जागा

ठळक मुद्दे राजगुरुनगर शहरात घडई मैदानात भरणारा आठवडेबाजार तर मोठी डोकेदुखी बाजारात २५ टक्के मोक्याची जागा पाटीधारक शेतकऱ्यांसाठी आरक्षित ठेवणे गरजेचे बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांकडून नगर परिषदेचे कर्मचारी पाटीमागे आकारतात २० रुपये शुल्क

राजगुरुनगर : राजगुरुनगर शहरातील भाजीबाजार पाटीधारक शेतकऱ्यांची मोठी समस्या बनली आहे. बाजारातील व्यापाºयांनी व्यापलेल्या जागांमुळे शेतकऱ्यांना बसण्यास जागाच मिळत नसल्याने शेतकरी रस्त्यावर बसतात; त्यामुळे वहातुकीचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
शेतकरी मेथी, कोथिंबिरीच्या जुड्या संध्याकाळी राजगुरुनगर मंडईत विकण्यासाठी आणतात. मात्र, बसण्यासाठी बाजारात जागाच नसते. नाइलाजास्तव रस्त्याच्या कडेला बसावे लागते.
कधी कधी पोलीस, नगर परिषदेचे कर्मचारी येतात आणि पाटी फेकून देतात. आम्ही बसायचे कुठे, याचे कुणीच उत्तर देत नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. राजगुरुनगर शहरात घडई मैदानात भरणारा आठवडेबाजार तर मोठी डोकेदुखी ठरत आहे. पाटीधारक शेतकरी सर्व रस्ताच व्यापून टाकत आहेत. भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक व त्यांच्या दुचाकी गाड्यांमुळे वाहतूककोंडीत मोठी भर पडते. दर रविवारीनगर परिषदेशेजारी भरणारा भाजीबाजार पूर्ण परिसर व्यापून टाकत आहे.
सध्या शेतात चांगला हिरवागार भाजीपाला होत असल्याने शेतकरी हात विक्रीसाठी बाजारात येत आहेत. त्याचप्रमाणे जुना मोटार स्टँडवर राजगुरू मंडई आणि टिळक चौकात नगर परिषदेशेजारी रोज बाजार भरतो. गडई मैदानावर फक्त शुक्रवारी आठवडेबाजार भरतो. बाकी ठिकाणी दररोज बाजार भरतात. राजगुरुनगर शहराची लोकसंख्या लाखापर्यंत जाऊन भिडली आहे. वाढत्या लोकसंखेच्या तुलनेत या तिन्ही ठिकाणी बाजारांच्या जागा पुरत नाहीत. बाजारातील सर्व मोक्याच्या जागा व्यापाºयांनीच अडवून ठेवलेल्या असतात. त्यामुळे राजगुरुनगर परिसरातून आलेल्या शेतकऱ्यांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. गडई मैदानावरील आठवडेबाजार बऱ्याचदा पोलीस चौकीपर्यंत जातो. तिथे कचऱ्याच्या दुर्गंधीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते.
..............
पोलिसांच्या कारवाईत पाटीधारक शेतकरीच बळी पडतात. व्यापाऱ्यांनी प्रमाणापेक्षा जास्त लाटलेल्या जागांबाबत कुणीच काही बोलत नाही. 
बाजार समितीच्या नियमानुसार बाजारात २५ टक्के मोक्याची जागा पाटीधारक शेतकऱ्यांसाठी आरक्षित ठेवणे गरजेचे आहे. त्याकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांचे मात्र हाल सुरू आहेत.

.
रविवारी बाजाराला तुडुंब गर्दी
नगर परिषदेजवळील बाजार तर रविवारी तुडुंब भरतो. पश्चिमेला गुरांचा दवाखाना, दक्षिणेला तहसील कार्यालय, तर पूर्वेला जैन स्थानकापर्यंत सर्व रस्त्यांवर पसरतो. 
नेहमीच्या मधल्या जागेतील जागा व्यापाऱ्यांनी अडविल्यामुळे तिथे शेतकऱ्यांना बसण्यास जागाच नसते. 
रविवारी स्थानिक रहिवाशांना रस्त्याने गाड्या घेऊन घरी जाता-येता येत नाही. राजगुरू मंडईतही व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना आत जागा नसल्याने शेतकरी वाडा रस्त्यातील पुलावर बसतात. 

हा रस्ता रहदारीचा असल्याने संध्याकाळी वहातुकीची प्रचंड कोंडी होते. शेतकऱ्यांनी कुठे बसायचे, हा प्रश्न निर्माण होतो. 
...............
बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांकडून नगर परिषदेचे कर्मचारी पाटीमागे २० रुपये शुल्क आकारतात. भाज्यांचे भाव पडल्यावर पाटीतील मालाचे शंभर रुपयेसुद्धा मिळत नाहीत. मात्र, त्यांना हे जाचक शुल्क द्यावे लागते. 
त्या प्रमाणात शेतकऱ्यांना कुठलीच सुविधा मिळत नाही. जास्त जागा अडविणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या तुलनेत खूपच कमी शुल्क आकारले जाते.

Web Title: farmers have no place to BAZAAR In Rajgurunagar market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.