शेतकरी पतीला विमा योजनेनुसार भरपाई मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 01:14 PM2020-01-31T13:14:03+5:302020-01-31T13:22:11+5:30

वाहन अपघातात पत्नीचा झाला होता मृत्यू

The farmer husband will get the compensation as per the insurance plan | शेतकरी पतीला विमा योजनेनुसार भरपाई मिळणार

शेतकरी पतीला विमा योजनेनुसार भरपाई मिळणार

Next
ठळक मुद्देग्राहक मंचाचा विमा कंपनीला आदेश तक्रारदाराने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी

पुणे : अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीला शेतकरी विमा योजनेनुसार नुकसानभरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केलेल्या तक्रारदार शेतकऱ्याला मंचाने दिलासा दिला. तक्रारदाराला दोन लाख रुपये नुकसान भरपाई सात टक्के व्याज दराने द्यावी. तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये द्यावेत, असा आदेश मंचाने दिला. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य अनिल जवळेकर, सदस्या शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला.
संगीता ज्ञानेश्वर वाघमारे यांचा २० सप्टेंबर २०१६ रोजी अपघात झाला. त्या बसने प्रवास करत असताना वेगाने आलेल्या कंटेनरने बसला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे पती ज्ञानेश्वर प्रभाकर वाघमारे (रा. चांदोली, खेड)  यांनी तलाठ्याकडे विम्याचा दावा आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. विमा कंपनीकडून विम्याचे दोन लाख रुपये १५ टक्के व्याजासह मिळावेत. नुकसानभरपाई म्हणून ५० हजार रुपये, तक्रारीचा खर्च म्हणून २५ हजार रुपये मिळावेत, अशी मागणी मंचाकडे दाखल केलेल्या दाव्यात केली होती. मात्र, विमा कंपनीने तक्रारदारांचा तो दावा मंजूर केला नाही किंवा नामंजूर केल्याचे देखील कळवले नाही. तसेच वाघमारे यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. (भाऊसाहेब शिरोळे भवन, चौथा मजला, पी. एम. टी बिल्डिंग, डेक्कन जिमखाना शिवाजीनगर, तालुका कृषी अधिकारी ता. खेड) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी तक्रारीत केली होती.
तक्रारदाराने दाखल केलेल्या सातबाऱ्याच्या उताऱ्यावरुन संगीता वाघमारे या २०१० पासून शेतकरी असल्याचे सिद्ध होते. पोलिसांनी दाखल केलेल्या जबाबानुसार संगीता अपघातात जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अपघाताच्या पुराव्यासाठी दाखल करावयाच्या कागदपत्रांमध्ये मयत किंवा अपघातग्रस्त शेतकरी यांचा सातबारा उतारा दाखल करावा, अशी प्राथमिक अट असल्याचा शासन निर्णय आहे. संगीता यांचा सातबारा उतारा तक्रारदाराने दाखल केला होता. त्यामुळे संबंधित कागदपत्रे दाखल केली नाहीत या कारणामुळे दावा नाकारणे योग्य होणार नाही, असे मंचाने निकालात नमूद केले आहे. 
........
नोटीस बजावूनही अधिकारी आले नाहीत
याप्रकरणात विमा कंपनीने लेखी जबाब दाखल केला. मयत व्यक्ती शेतकरी असणे ही विम्याची रक्कम मिळण्यासाठी प्रमुख अट आहे. मयत संगीता या शेतकरी नव्हत्या. विमा कंपनीने तक्रारदारांकडे अनेकदा अनेक कागदपत्रांची मागणी करूनही त्यांनी विमा कंपनीला कागदपत्रे दिली नाहीत.
..........
मयत संगीता या शेतकरी असल्याचा कोणताही पुरावा तक्रारदारांनी कंपनीला दिला नाही. त्या विमा योजनेअंतर्गत विमा मिळण्यास पात्र ठरत नाही, असे म्हणणे कंपनीतर्फे जबाबात नमूद केले होते. तर तालुका कृषी अधिकारी नोटीस बजावूनही हजर झाले नाहीत.
................

Web Title: The farmer husband will get the compensation as per the insurance plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.