प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधुंना फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 22:48 IST2021-06-24T22:48:07+5:302021-06-24T22:48:41+5:30
फसवणूक प्रकरणात पुण्यातून ताब्यात घेऊन सायंकाळी पथक मुंबईला रवाना

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधुंना फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
पुणे : मुंबईपोलिसांनी पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधुंना पुण्यातून गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेऊन मुंबईला नेण्यात आले आहे.
श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे (वय ६३), शशांक पुरुषोत्तम परांजपे (वय ५९) अशी या बांधकाम व्यावसायिकांची नावे आहे. याप्रकरणी वसुंधरा डोंगरे यांनी विर्लेपार्ले पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांनुसार ४७६, ४६७, ४६८, ४२० व १२० (ब) या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी या परांजपे यांच्या कुटुंबियांशी संबंधित आहेत. परांजपे यांच्या काही जागा या मुंबईतील विलेपार्ले परिसरात आहेत. ती जागा विकण्यात आली आहे. फिर्यादी या वारस असताना त्यांना काहीही न सांगता त्यांना कळू न देता ही जागा विकण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. बनावट दस्त बनवून तसेच विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांचे एक पथक तातडीने पुण्यात आले. परांजपे बंधुंना सायंकाळी डेक्कन परिसरातील राहत्या घरातून ताब्यात घेतले. डेक्कन पोलिसांना याबाबत माहिती देऊन हे पथक मुंबईला रवाना झाले. लागोपाठ दोन बांधकाम व्यावसायिकांना फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आल्याने पुण्यातील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.