Fake letter prepared in the name of Industry Minister to get MIDC plot; Crime against youth in Baramati | एमआयडीसीचा भूखंड मिळविण्यासाठी तयार केले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नावे बनावट पत्र

एमआयडीसीचा भूखंड मिळविण्यासाठी तयार केले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नावे बनावट पत्र

बारामती: बारामती एमआयडीसीतील भूखंड मिळविण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नावाचे बनावट शिफारस पत्र तयार करत शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी बारामतीच्या युवकाविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सलिम फकिर महंमद बागवान (वय 55, रा. कचेरी रोड, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.त्यानुसार येथील सोहेल गुलमोहमंद शेख (बागवान) (रा. साहिल बंगला, बारामती क्लब रोड, बारामती) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गतवर्षी हा प्रकार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सोहेल शेख यांच्या सासऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. सोहेल व त्याच्या सासऱ्यातील वाद मिटविण्याकामी बागवानने पुढाकार घेतला होता. याकामी सोहेल याने त्यांची भेट घेतली असता सासऱ्यांनी दिलेले पत्र सोहेल याला दाखविले. त्याने मूळ पत्र सादर करत उद्योगमंत्र्यांनी बारामती एमआयडीसीतील भूखंड माझ्या नावे होण्याची  शिफारस केली असल्याचे सांगितले. सासऱ्यांनी सरकारी रक्कम न भरल्याने माझी शिफारस झाल्याचे तो म्हणाला. 

या पत्राविषयी फिर्यादी बागवान यांनी अधिक माहिती घेतली. यावेळी त्यावर २८ जून २०१९ अशी तारीख असल्याचे दिसून आले. त्यावर फिर्यादीने बारामती व पुणे एमआयडीसी कार्यालयाकडे माहिती मागितली. परंतु, त्यांच्याकडे असे कोणतेही पत्र नसल्याचे दिसून आले. फिर्यादीने माहिती अधिकारात उद्योग व खणीकर्म मंत्रालयाकडे माहिती मागवली. त्यावेळी असे कोणतेही पत्र ना. देसाई यांच्या कार्यालयाकडून देण्यात आले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. शिवाय यासंबंधी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्याला बनावट पत्रासंबंधी माहिती देण्यात आली.

मात्र, संबंधित प्रकार बारामतीत घडल्याने तक्रार देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार फिर्याद देण्यात आली. आहे. सोहेल याने बारामती औद्योगिक वसाहतीमधील कटफळ येथील प्लॉट क्र. जी- ३५  हा स्वत:च्या नावे होण्यासाठी उद्योगमंत्र्यांचे बनावट शिफारस पत्र तयार केले. हा खोटा दस्तावेज स्वत:जवळ बाळगून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fake letter prepared in the name of Industry Minister to get MIDC plot; Crime against youth in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.