बेल्ह्यात ३ दशकांपासून वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी बोगस डॉक्टरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 09:40 IST2024-12-28T09:40:12+5:302024-12-28T09:40:26+5:30
बांगलादेशी तरुण १९९० सालापासून बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करत होता.

बेल्ह्यात ३ दशकांपासून वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी बोगस डॉक्टरला अटक
आळेफाटा : बनावट कागदपत्रांच्या आधारे ती दशकांपासून बेल्ह्यात वास्तव्यास राहून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी बोगस डॉक्टरला दहशतवादी पथकाने गुरुवारी सायंकाळी अटक केली.
बेल्ह्यात सुकुमार पंचानन बिश्वास हा बांगलादेशी तरुण १९९० सालापासून बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करत होता. त्याच्याविरुद्ध दहशतवादी पुणे पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुनील गायकवाड यांनी फिर्याद दिल्यानंतर आळेफाटा पोलिस ठाण्यात परकीय नागरिक कायदा १९४६ कलम १४, पारपत्र अधिनियम १९६७ नियम ३, ६, पारपत्र(भारतात प्रवेश)परकीय नागरिक आदेश १९५० चे कलम ३(अ)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुकुमार बिश्वास व त्याची पत्नी ललिता या दोघांचे पास पोर्ट, व्हिसा, पॅन, आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड, बँकेचे चेकबुक, पतसंस्था व बँकेच्या खात्याची एटीएम कार्ड त्याने केलेल्या आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे दहशतवादी पथकाने जप्त केली आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करीत आहेत. दरम्यान, डॉक्टरची पाच दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असल्याचे आळेफाटा पोलिसांनी सांगितले आहे.
आरोग्य विभागाने सुकुमार पंचानन बिश्वास याला बोगस ठरवून वैद्यकीय व्यवसायाला घातलेली बंदी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारावर रद्द केली होती याची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का? सुकुमार बिश्वास याने जुन्नर, पारनेर ,श्रीगोंदा, कल्याण, मुंबई आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा व जमीन खरेदी केल्या आहेत. परिसरात मोठ्या व्यावसायिकांना भागीदारीसाठी त्याच्याकडे रक्कम कशी आली? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.