पुणे - महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांशी बोलतांना महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. माजी आरोग्यमंत्रीतानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील 3,200 कोटी रुपयांच्या टेंडरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, तानाजी सावंत यांचे टेंडर स्थगित करण्याच्या निर्णयावर प्रकाश आबिटकर म्हणाले, एखाद्या कामात अनियमितता आढळल्यास त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. यात कोणत्याही पक्षाचा संबंध नाही. तानाजी सावंत यांनी 30 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यातील एका खासगी कंपनीला 3,190 कोटी रुपयांची टेंडर मंजूर केली होती. या टेंडर्समध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असून, यातील पारदर्शकता तपासली जात आहे असे आबिटकर म्हणाले.
यावेळी त्यांनी राज्यातील बालकांच्या आरोग्य तपासणी मोहिमेबाबत माहिती दिली. राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. सुमारे 14 ते 15 लाख मुलांचे आरोग्य तपासले जाईल, यामध्ये गंभीर आजार असलेल्या मुलांवर तातडीने उपचार केले जातील. गरज पडल्यास शस्त्रक्रियाही केली जाणार असल्याचे आबिटकर यांनी स्पष्ट केले.
कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू, पण घाबरण्याचे कारण नाही अशा सूचना त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिल्या. राज्यात बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू आढळला असला तरी कोणत्याही व्यक्तीला या आजाराची लागण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. सध्या चिकन शॉप बंद करण्याची गरज नाही, मात्र आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत, यामध्ये केवळ व्यसन करणाऱ्यांनाच हा आजार होत नाही, तर लहान मुलींनाही तो होत आहे,ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे महिला आणि तरुणींना कॅन्सरची मोफत लस देण्याचा विचार आम्ही करत आहोत" असे आबिटकर यांनी सांगितले.