शिधापत्रिकाधारकांना दिलासा; रेशनकार्डच्या ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:59 IST2024-12-28T12:56:43+5:302024-12-28T12:59:09+5:30

प्रमाण १०० टक्के करण्यासाठी राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी बंधनकारक केले

Extension of e-KYC process for ration cards | शिधापत्रिकाधारकांना दिलासा; रेशनकार्डच्या ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ

शिधापत्रिकाधारकांना दिलासा; रेशनकार्डच्या ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ

पिंपरी : स्वस्त धान्य दुकानात वितरणात होणारी गळती रोखण्यासाठी शासनाने राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. याची अंतिम तारीख यापूर्वी ३१ डिसेंबर होती, परंतु आता शासनाकडून प्रक्रियेस मुदवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व ग्राहकांचे रेशनकार्डला आधार क्रमांक जोडण्यात आले आहेत, तरीदेखील वितरणात २ ते ४ टक्क्यांची गळती असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण १०० टक्के करण्यासाठी राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. कार्डवरील कुटुंबातील सर्व सदस्यांनी अद्ययावत असलेले आधारकार्ड घेऊन दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोरजी ई-पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे स्कॅन करून ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. याची अंतिम तारीख यापूर्वी ३१ ऑक्टोबर होती, मात्र गेल्या काही महिन्यांपासून सर्व्हर डाऊनमुळे ई-केवायसी व्यवस्था कोलमडली होती.

त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे ई-केवायसी करता आले नव्हते. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रियेस मुदवाढ देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही सर्व्हर डाउन आणि मशीनमधील तांत्रिक अडचणीमुळे केवायसी करण्यास अडचणी येत होत्या. अनेक शिधापत्रिकाधारकांचे अजूनही ऑनलाइन केवायसी झालेले नाही. त्यामुळे शासनाने आता पुन्हा एकदा या प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. नागरिकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावे. - प्रशांत खताळ, सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी 

 

Web Title: Extension of e-KYC process for ration cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.