पुणे : भरधाव ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. हडपसर भागातील शेवाळवाडी चौकात अपघाताची घटना घडली होती. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ओंकार मधुकर गवळी (वय २७, रा. मरकळ रस्ता, आळंदी देवाची) असे उपचारादरम्यान मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मधुकर गवळी (वय ५८) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार ओंकार १८ डिसेंबर रोजी हडपसरकडे निघाला होता. त्यावेळी शेवाळवाडी चौकात बोअरवेल खोदाई करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वार ओंकारला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या ओंकारला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ओंकार याच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्याचे वडील मधुकर यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक अनिल बिनवडे तपास करीत आहेत.