३ तासात होत्याचं नव्हतं झालं; भिगवणला ढगफुटी सदृश पाऊस , शेतीचे नुकसान, पशुही दगावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:56 IST2025-05-26T12:55:59+5:302025-05-26T12:56:33+5:30
गावांमधील शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले तर ओढ्याना पूर आल्याने गाई म्हशीसह शेळ्या मेंढ्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले

३ तासात होत्याचं नव्हतं झालं; भिगवणला ढगफुटी सदृश पाऊस , शेतीचे नुकसान, पशुही दगावले
भिगवण : मान्सूनपूर्व पावसाने रविवार (दि,२५) रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने भिगवण परिसरातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. भिगवण जवळील मदनवाडी, तक्रारवाडी, डिकसळ, शेटफळगढे लगतच्या स्वामी चिंचोली, खडकी, रावणगाव (ता. दौड) सिद्धेश्वर निंबोडी (ता. बारामती) आदी गावांमधील शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले तर ओढ्याना पूर आल्याने गाई म्हशीसह शेळ्या मेंढ्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत.
सोमवारी (दि,२६) रोजी शासकीय यंत्रणा पंचनामा करण्याच्या कामाला लागली असून राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भिगवण परिसरातील नुकसान झालेल्या भागाला भेट दिली. तहसीलदार जीवन बनसोडे यांना नुकसान झालेल्या सर्व घटकांचा पंचनामा करत कोणीही यापासून वंचित राहू नये अश्या सूचना केल्या आहेत. या भेटीवेळी मदनवाडी (ता. इंदापूर ) येथील शेतकऱ्यांनी मंत्र्यांपुढे पाढा वाचत ओढ्यालगत झालेल्या अतिक्रमणामुळे ही वेळ आल्याचे सांगत तात्काळ अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात यावे अशी विनंती शेतकऱ्यांनी केली.