"सर्व आपापल्या ठिकाणी व्यवस्थित..." ठाकरे बंधू, पवार यांच्या एकत्रीकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
By नितीन चौधरी | Updated: May 15, 2025 19:25 IST2025-05-15T19:24:13+5:302025-05-15T19:25:31+5:30
आता कोणी एकत्र यावे न यावे, याबाबत सल्ला देण्याएवढे माझे वय नसून मी सल्ला किंवा सूचना देण्याच्या भूमिकेत नाही

"सर्व आपापल्या ठिकाणी व्यवस्थित..." ठाकरे बंधू, पवार यांच्या एकत्रीकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
पुणे : पुण्यात पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यास गुरुवारी (दि. १५) सुरुवात झाली. यावेळी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना मुंडे भाऊ बहीण एकत्र आले तसेच पवार आणि ठाकरे कुटुंबीय एकत्र येणार का असा प्रश्न विचारला होता. त्यावर पंकजा मुंडे यांनी समयसूचकता दाखवत उत्तर दिले. मी सर्वच राजकीय पक्ष घराण्यांच्या जवळ आहे. माझे वडील गोपीनाथ मुंडे यांची ही पुण्याई आहे. मात्र, आता कोणी एकत्र यावे न यावे, याबाबत सल्ला देण्याएवढे माझे वय नाही. मी सल्ला किंवा सूचना देण्याच्या भूमिकेत नाही. सर्व जण आपापल्या ठिकाणी व्यवस्थित राहावे एवढीच अपेक्षा आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
पशुसंवर्धन विभागात आता समुपदेशनाने बदल्या झाल्या आहेत. यातून अधिकाऱ्यांना समान अधिकार मिळणार आहेत. यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही. तसेच बदल्यांचा हा पॅटर्न कायम ठेवणार आहे. यामध्ये बदलीपात्र अधिकाऱ्यांचे समुपदेशन करून सुमारे ५५० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये विशेष म्हणजे काही अधिकाऱ्यांनी दुर्गम आदिवासी भागात बदली मागितली होती. अशी माहिती त्यांनी यावेळी यांनी दिली. हा विभाग जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी आणि ग्रामीण भागात उद्योजक निर्माण होण्यासाठी लवकरच काही योजना आणणार आहोत, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
मुंडे म्हणाल्या, पशुसंवर्धन हा विभाग ग्रामीण आणि शहरी भागाशी निगडित विभाग आहे. तसेच हा विभाग उद्योजकांचा विभाग आहे. यामध्ये डेअरी, फिशरी, पोल्ट्री आदी व्यवसायांचा संबंध येतो. मात्र, तरीही हा विभाग जरासा दुर्लक्षित असून, विभाग जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी आणि ग्रामीण भागात उद्योजक निर्माण होण्यासाठी लवकरच योजना आणणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना योजनेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे, त्यांनाही योजना आवडलेली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात योजना जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.