Dahi Handi 2021 : यंदाही दहीहंडीला परवानगी नाहीच; शहरात राहणार पोलिसांचा कडक बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 20:57 IST2021-08-30T20:44:34+5:302021-08-30T20:57:41+5:30
गतवर्षीप्रमाणे गर्दी न करता दहीहंडी उत्सव साधेपणाने करण्याचे आवाहन

Dahi Handi 2021 : यंदाही दहीहंडीला परवानगी नाहीच; शहरात राहणार पोलिसांचा कडक बंदोबस्त
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कोणत्याही मंडळाने गर्दी जमवून दहीहंडी उत्सव साजरा न करता साधेपणाने उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील प्रमुख दहीहंडी उत्सव मंडळांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. तसेच गतवर्षीप्रमाणे गर्दी न करता उत्सव साधेपणाने करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला सर्व दहीहंडी मंडळांनी उत्स्फृर्त प्रतिसाद दिला आहे.
शहरात आज रात्रीपासून शहर पोलीस दलाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी पोलिसांची गस्त असणार आहे. पोलीस उपायुक्तांसह सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोठेही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी मंगळवारी दिवसभर कडक बंदोबस्त ठेवणार आहे.
.....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्धारित केलेल्या आदेशाचे सर्वांनी पालन करावे. गर्दी तसेच परस्पर स्पर्श यातून कोरोनाच्या उद्रेकाचा धोका लक्षात घेऊन सर्वांनी काळजी घ्यावी. उत्सव साधेपणाने साजरा करावा.
डॉ, रवींद्र शिसवे, पोलीस सहआयुक्त, पुणे शहर