जुलै अर्धा संपत आला तरी पावसाळीपूर्व कामे अपूर्णच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:01 IST2025-07-15T13:00:55+5:302025-07-15T13:01:42+5:30
पुणे : महापालिकेकडून दरवर्षी पावसाळीपूर्व कामाअंतर्गत शहरातील नाले, ओढे, शहरातील गटारांची स्वच्छता केली जाते. पण यंदा मे महिन्यात मोठ्या ...

जुलै अर्धा संपत आला तरी पावसाळीपूर्व कामे अपूर्णच
पुणे : महापालिकेकडून दरवर्षी पावसाळीपूर्व कामाअंतर्गत शहरातील नाले, ओढे, शहरातील गटारांची स्वच्छता केली जाते. पण यंदा मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पावसाळीपूर्व कामांचा खोळंबा झाला होता. त्यानंतर पावसाळीपूर्व कामे करण्यास सुरवात झाली. परंतु जुलै महिना अर्धा संपत आला तरीदेखील ही कामे अपूर्णच आहेत.
महापालिका हद्दीतील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नालेसफाईसाठी २३ निविदा काढल्या असून, १४ कोटी खर्च करण्यात येत आहे. पावसाळी गटारे स्वच्छ करण्यासाठी १२ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पावसाळापूर्व नाल्यांमधील कचरा, वाढलेले गवत यांसह पाण्याच्या प्रवाहात येणारे अडथळे काढण्याची कामे याअंतर्गत करून ती पूर्ण होणे अपेक्षित होते. तसेच पावसाळी वाहिन्यांची साफसफाई करणे अपेक्षित होते. पण अद्यापही काही ठिकाणी ही कामे पूर्ण झालेली नाही. अनेक भागांतील नाल्याची साफसफाई अपूर्णच आहे.
शहरात पावसाचे पाणी साचणारी २२८ ठिकाणे आहेत. त्यापैकी १०० ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ५५ ठिकाणी तात्पुरती उपाय योजना केली आहे. शहरातील ३४ पाणी साचणारी ठिकाणी विद्युत पंप, कामगार लावून चारी तयार करून पाणी काढून द्यावे लागते. पाणी साचणारी दहा ठिकाणे पालिका हद्दीबाहेरची आहेत. उर्वरित २८ पाणी साचणाऱ्या ठिकाणी अद्यापही कामे सुरू आहेत.
समाविष्ट गावातील नालेसफाई अर्धवटच
मे महिन्यात पाऊस झाल्यामुळे पावसाळापूर्व कामांमध्ये खोळंबा निर्माण झाला होता. त्यानंतरही समाविष्ट गावामधील नालेसफाईची धोकादायक ठिकाणीची कामे झाली आहेत. मात्र अन्य ठिकाणची नालेसफाईची कामे अधर्वटच आहेत.
नाल्यामध्ये टाकला जातो मोठ्या प्रमाणात कचरा
पुणे महापालिका नाल्याची साफसफाई करते. मात्र या नाल्यामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे नालेसफाई करूनही कचरा टाकल्यामुळे ‘जैसे थे’ परिस्थिती होते.
शहरात पावसाचे पाणी साचणारी २२८ ठिकाणे आहेत. त्यापैकी १०० ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ५५ ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. उर्वरित २८ पाणी साचणाऱ्या ठिकाणी अद्यापही कामे सुरू आहेत. - संतोष तांदळे, अधिक्षक अभियंता, पुणे महापालिका