शेजारील देशांनी काही अराजक माजवले, तरी काश्मिरी जनता त्यांना कधीच साथ देणार नाही - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:25 IST2025-09-25T15:24:31+5:302025-09-25T15:25:05+5:30
शेजारी देशांनी तिथे अराजक माजवले, हिंसाचार घडवला पण काश्मिरी जनतेने आपण देशाचा अविभाज्य भाग असल्याचे वेळोवेळी सिद्ध केले

शेजारील देशांनी काही अराजक माजवले, तरी काश्मिरी जनता त्यांना कधीच साथ देणार नाही - शरद पवार
पुणे: काश्मीर हा भारताचा हीरा आहे. शेजारील देशांनी काहीही केले, तरी काश्मिरी जनता त्यांना कधीच साथ देणार नाही. काश्मिरी जनतेचे देशसेवेत मोठे योगदान आहे. शेजारी देशांनी तिथे अराजक माजवले, हिंसाचार घडवला पण काश्मिरी जनतेने आपण देशाचा अविभाज्य भाग असल्याचे वेळोवेळी सिद्ध केले. काश्मिरी जनतेच्या या प्रयत्नांना सरहदसारख्या संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काश्मीरसोबत सारा देश उभा आहे, हे सरहदने दाखवून दिले आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
काश्मीरमधील शिक्षणतज्ज्ञ विजय दुर्गाप्रसाद धर यांच्या नावाने सरहद ग्लोबल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज संस्थेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘विजय धर ॲम्फी थिएटर’चे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विजय धर, त्यांच्या पत्नी कविता धर, कन्या कनिका धर, सरहद संस्थेचे संजय नहार, प्राचार्य सुषमा नहार, संतसिंग मोखा, डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, इम्रान शेख, वसंत मोरे आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, पुण्याने देशाला नवा मार्ग दाखवण्याचे कार्य केले आहे. देशातील जनतेला एकत्रित आणण्याचे कार्य याच पुण्यातून लोकमान्य टिळक यांनी केले. कार्याचे शतक पूर्ण केलेल्या अनेक संस्था पुण्यात आहेत. पंजाब एकेकाळी देशाचे धान्यकोठार होता. पंजाबचे योगदान लक्षणीय आहे. काश्मीरमधील परिस्थिती बराच काळ अस्थिर, अशांत आणि चिंताजनक होती. त्यामुळे शिक्षणक्षेत्राची हानी झाली होती. पण विजय धर तसेच सरहद सारख्या संस्थांनी सामाजिक दायित्व जाणून या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे .
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना, मी केंद्रीय गृहमंत्री होतो. तेव्हा काश्मीरमधील परिस्थिती आटोक्यात होती. आता ती बिघडली आहे. पहलगाम प्रकरण ताजे आहे. याला जबाबदार कोण, याचा विचार जनतेने केला पाहिजे. संजय नहार यांनी प्रस्ताविक केले. गुजरवाडी शैक्षणिक संकुलासाठी कार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. लेशपाल जवळगे यांनी आभार मानले. नीरजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले.