Bhagat Singh Koshyari: सव्वासातशे वर्षानंतरही माऊलींचे विचार समाजासाठी प्रेरक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 19:13 IST2021-11-29T19:12:08+5:302021-11-29T19:13:07+5:30
माऊलींच्या विचारांची शिकवण वाढत असून त्यांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले

Bhagat Singh Koshyari: सव्वासातशे वर्षानंतरही माऊलींचे विचार समाजासाठी प्रेरक
आळंदी : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. सव्वासातशे वर्षांनंतर माऊलींच्या विचारांची शिकवण वाढत असून त्यांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले आहे. तीर्थक्षेत्र आळंदीत श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राज्यपालांनी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आयोजित रौप्यमहोत्सवी वर्षाच्या लोगोचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
''पुज्य ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी स्थळाच्या दर्शनाचा लाभ झाल्याने धन्य झालो. माऊलींनी चराचरातील लहानमोठ्यांना आईचे ममत्व दाखवले आहे. त्यामुळे आजही त्यांनी केलेला उपदेश समाजात प्रेरक आहे. माऊलींना प्रार्थना करतो की, आपले छत्र संपुर्ण विश्वातील प्राणीमात्रावर असावे. जेणेकरुन माऊलींच्या विचारांवर भागवतधर्म सन्मानाने चालत राहिल असा विचार कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला.''
त्यानंतर वीणामंडपात सुरू असलेल्या कीर्तनात वीणा गळयात घेऊन त्यांनी माऊलींचा गजर केला. देवस्थानच्या वतीने माऊलींची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त ॲड. विकास ढगे - पाटील, आयुक्त कृष्ण प्रकाश, प्रांतधिकारी विक्रांत चव्हाण, उपायुक्त प्रेरणा कट्टे, तहसीलदार वैशाली वाघमारे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, स्वप्नील निरंजनाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते.