Municipal Elections: नावातील चुका, दुसऱ्या प्रभागात नाव गेले असल्यास दुरुस्ती, प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 09:42 IST2025-10-15T09:41:27+5:302025-10-15T09:42:26+5:30
६ नोव्हेंबरला प्रारूप मतदारयादी जाहीर होणार असून, त्यावरील हरकती, सूचनांवर विचार करून १० डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार

Municipal Elections: नावातील चुका, दुसऱ्या प्रभागात नाव गेले असल्यास दुरुस्ती, प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
पुणे: राज्य निवडणूक आयोगाने पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ६ नोव्हेंबरला प्रारूप मतदारयादी जाहीर होणार असून, त्यावरील हरकती, सूचनांवर विचार करून १० डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ पर्यंतची यादी महापालिका प्रशासनाकडे पाठवली आहे. कसबा पेठ, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला, शिवाजीनगर यांसह शिरूर आणि पुरंदर विधानसभा या मतदारसंघांतील महापालिकेच्या हद्दीतील सुमारे ३६ लाख ४३ हजार मतदारांचा यात समावेश आहे.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर नोंदवता येणार हरकती
महापालिका आयुक्तांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने निवडणूक आयोगाची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करून त्यावर नागरिकांच्या हरकती नोंदवता येणार आहेत. या हरकतींनुसार केवळ लेखनिकांच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असतील, विधानसभा मतदारसंघाच्या यादीत मतदारांची नावे असूनही महापालिकेच्या संबंधित प्रभागाच्या यादीतून वगळली असल्यास अशा मतदारांची नावे प्रभागाच्या यादीत समाविष्ट करता येतील. मृत व्यक्तींची नावे आढळल्यास किंवा त्याबाबत हरकती प्राप्त झाल्यास त्यांची नोंद मार्क कॉपीमध्ये करण्यात येणार आहे.
लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक
कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे देशाची जनगणना झाली नाही. त्यामुळे पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी २०११ ची लोकसंख्या गृहीत धरली आहे. पुण्याची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ३४ लाख ८१ हजार ३५९ आहे. पुणे शहरातील मतदारसंख्या १ जुलै २०२५ पर्यंतची ३६ लाख ४३ हजार आहे. काही प्रभागांत लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक असणार आहे. जनगणना न झाल्याचा फटका असाही बसणार आहे.
मतदारयादी कार्यक्रम पुढीलप्रमाणे
मतदार यादी ग्राह्य धरण्याची तारीख : १ जुलै २०२५
पालिकेला दिलेल्या युजर आयडीचा वापर करून मतदारयादी डाउनलोड करणे : १४ ऑक्टोबर २०२५
तयार केलेली प्रारूप मतदार यादीवर हरकती सूचना मागविण्यासाठी यादी प्रसिद्ध करणे : ६ नोव्हेंबर २०२५
प्रारूप मतदार यादीवर हरकती सूचना दाखल करण्यासाठी अंतिम तारीख : १४ नोव्हेंबर २०२५
हरकतींचा विचार करून अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणे : २८ नोव्हेंबर २०२५
मतदान केंद्रांची यादी जाहीर करणे : ४ डिसेंबर २०२५
मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे : १० डिसेंबर २०२५.