लाल महालात शाहिस्तेखानाच्या पराभवाचे शिल्प उभारा; लाल महाल स्मारक समितीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 10:13 IST2025-04-03T10:12:44+5:302025-04-03T10:13:16+5:30
जागतिक पातळीवरील पहिला सर्जिकल स्ट्राईक अशी ओळख असलेल्या या घटनेचे शिल्परूपी स्मारक लाल महालात व्हावे

लाल महालात शाहिस्तेखानाच्या पराभवाचे शिल्प उभारा; लाल महाल स्मारक समितीची मागणी
पुणे: औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान पुण्यातील लाल महालात तीन वर्षे ठाण मांडून होता. तेथे मोठ्या हुशारीने पोहोचून छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली. महाराजांच्या या अतुलनीय पराक्रमाची आठवण जपण्यासाठी लाल महालात या प्रसंगाचे शासनाने ऐतिहासिक शिल्प उभारावे, अशी मागणी लाल महाल स्मारक समितीचे हर्ष सगरे, मुकुंद चव्हाण, सुनील तांबट आणि दिनेश भिलारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटून लाल महालात केलेली फजिती याचे स्मारक बनविणे आवश्यक आहे. शाहिस्तेखान पुण्यात तीन वर्षे राहून स्वराज्यातील रयतेला हैराण करीत होता. अवघ्या मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या जिवाची परवा न करता शाहिस्तेखानावर हल्ला केला. त्यात शाहिस्तेखानाचा जीव वाचला; परंतु, त्याची बोटे छाटली गेली. त्यानंतर घाबरून तो तेथून तीन दिवसांत पळून गेला. ही घटना ५ एप्रिल १९६३ रोजी घडली. दुसऱ्याच दिवशी रामनवमी होती. त्यामुळे अशा प्रकारचे स्मारक तसेच त्या प्रसंगाचे शिल्प - ऑडिओ स्वरूपात उभे करावे. जागतिक पातळीवरील पहिला सर्जिकल स्ट्राईक अशी ओळख असलेल्या या घटनेचे शिल्परूपी स्मारक लाल महालात व्हावे व जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना त्याची माहिती कळावी, अशी समस्त शिवभक्तांची मनापासून मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.