‘रायरेश्वरा’वर स्वच्छता करून भोरमधील दिव्यांगाची सायकलवरून दिल्ली वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 18:00 IST2017-12-04T17:50:57+5:302017-12-04T18:00:54+5:30
भोर येथील पोपट जयवंत खोपडे हे अपंग असून स्वच्छता व पर्यावरण बचावाचा संदेश देण्यासाठी रायरेशवर किल्ला (ता. भोर) ते संसद भवन दिल्ली हा सुमारे १,८९३ किलो मीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहे.

‘रायरेश्वरा’वर स्वच्छता करून भोरमधील दिव्यांगाची सायकलवरून दिल्ली वारी
भोर : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून भोर येथील पोपट जयवंत खोपडे हे अपंग असून स्वच्छता व पर्यावरण बचावाचा संदेश देण्यासाठी रायरेशवर किल्ला (ता. भोर) ते संसद भवन दिल्ली हा सुमारे १,८९३ किलो मीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहे. त्याची सुरवात त्याने रविवारी रायरेश्वर किल्ल्यावर स्वच्छता करून केली.
नवल फाउंडेशन पुणेच्या वतीने ३ डिसेंबरला जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून स्वच्छता व पर्यावरण बचाव दिव्यांग संदेश यात्रा २०१७चे आयोजन करण्यात आले आहे. भोर तालुक्यातील नाझरे येथील पोपट खोपडे हा अपंग तरुण सायकलवरून रायरेश्वर किल्ला ते नागपूर मार्गे संसद भवन दिल्ली, असा सुमारे १,८९३ किलोमीटरचा प्रवास करणार असून वाटेत गावोगावी स्वच्छतेचा संदेश देणार आहे.
रविवारी पोपट खोपडे यांनी रायरेश्वर किल्ल्यावर स्वच्छता करून त्याची सुरुवात केली. त्यानंतर डोंगर उतरून भोर शहरात आल्यावर सम्राट चौकातील क्रांतिस्तंभाची स्वच्छता करून पुष्पहार घालून सायकलवरून प्रवास सुरू झाला. या वेळी नगराध्यक्ष तृप्ती किरवे, माजी सभापती वंदना धुमाळ, सीमा तनपुरे, अॅड. जयश्री शिंदे, रेखा टापरे, सोपान शिंदे, बंडू खोपडे, राम घोणे, आशा खोपडे, सुनीता बदक उपस्थित होते.
एकूण ५० ठिकाणी मुक्काम
दररोज साधारपणे ४० ते ६० किलोमीटरचा प्रवास होणार असून प्रवासात एकूण ५० ठिकाणी मुक्काम करावा लागणार आहे. प्रवासादरम्यान वाटेत असणाºया राष्ट्रीय स्मारकाची स्वच्छता करून लोकांना स्वच्छतेचा संदेश देणार आहेत.
२१ डिसेंबरला नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, तर २१ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्र मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली या राज्यांतून सायकलवरून प्रवास होणार असून या सायकल प्रवासासाठी नवल फाउंडेशनने दोन सायकली त्यांना दिल्या आहेत.
विविध विक्रमांवर कोरले नाव
पोपट खोपडे हे अपंग असूनही त्यांनी यापूर्वी भोर, वेल्हे, पुरंदर तालुक्यातील किल्ले व ऐतिहासिक स्थळांना घोड्यावरून भेटी दिल्या आहेत. प्रवास करून लिम्का बुक आॅफ रेकॉड्स केले आहे. याही वेळी लिम्का बुकची टीम त्यांच्याबरोबर राहणार आहे. सहा महिन्यांपासून त्यांचा पुण्यात सायकल सराव सुरू होता. प्रवासादरम्यान दोन सायकल वापरल्या जाणार आहेत. बरोबर दोन गाड्या असतील.