संपूर्ण महाराष्ट्र भाजपामय केल्याशिवाय राहणार नाही - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 12:42 IST2019-12-09T12:41:58+5:302019-12-09T12:42:34+5:30
इंदापूर येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

संपूर्ण महाराष्ट्र भाजपामय केल्याशिवाय राहणार नाही - देवेंद्र फडणवीस
पुणे : आम्ही धोक्याने सत्तेपासून बाहेर राहिलो, मात्र आम्हाला फार काळ कोणी रोखू शकणार नाही. येत्या काळात आपलंच सरकार येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच, ईश्वराचा संकेत आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा भाजपामय करा. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र भाजपामय केल्याशिवाय राहणार नाही, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
इंदापूर येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते-पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सुभाष देशमुख, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, राम सातपुते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील आणि माझादेखील ॲक्सिडेंट (अपघाताने पराभव) झाला आहे. पण काळजी करण्याचे कारण नाही, फार काळ कोणी आपल्याला मागे ठेऊ शकत नाही. आत्ता आपण धोक्याने बाहेर राहिलो आहोत. पण, तुम्ही पुणे जिल्ह्यापुरते नेते नाहीत. पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात आमच्यासोबत तुम्हाला मैदानात उतरावे लागेल. कारण तुमच्यामध्ये तेवढी क्षमता आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याचबरोबर, जनतेने आपल्याला निवडून दिले आहे. आपल्याला दिलेल्या जागांपैकी ७० टक्के जागा आपण जिंकलो आहोत. महाराष्ट्राच्या ४० वर्षांच्या इतिहासात एकही पक्ष ७० टक्के जागा जिंकलेला नाही. पण भाजपाने ७० टक्के जागा जिंकल्या. पण दुर्दैवाने ज्यांना आपण सोबत घेतले होते, त्यांनी जनादेशाशी विश्वासघात केला, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.