प्राधिकरणाच्या भूखंडांना अतिक्रमणाचा विळखा, प्रशासनाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 00:47 IST2019-02-08T00:44:19+5:302019-02-08T00:47:38+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे शहरातील राखीव भूखंडावर दिवसेंदिवस होणाऱ्या अतिक्रमणावर वारंवार कारवाई केली जाते.

प्राधिकरणाच्या भूखंडांना अतिक्रमणाचा विळखा, प्रशासनाचे दुर्लक्ष
रहाटणी : पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे शहरातील राखीव भूखंडावर दिवसेंदिवस होणाऱ्या अतिक्रमणावर वारंवार कारवाई केली जाते. मात्र कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारची दक्षता घेत नसल्याचे दिसून येत आहे. नवनगर विकास प्राधिकरणाने अनेक भूखंडांवरील अतिक्रमणे काढून टाकली आहेत. मात्र त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या राखीव भूखंडावर पुन्हा एकदा अतिक्रमणाचा विळखा निर्माण झालेला आहे. रोज होणाºया अतिक्रमणाला जबाबदार कोण, असा प्रश्न शहरवासीय विचारू लागले आहेत.
शहरातील काळेवाडी, रहाटणी, थेरगाव भागातील अनेक ठिकाणच्या प्राधिकरणाच्या राखीव जागेवर अनेक प्रकारचे अतिक्रमण करून भूखंड ताब्यात घेतल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे, अशा भूखंडावरील अतिक्रमण काढण्याचे काम अनेक वेळा प्राधिकरणाकडून करण्यात आलेले आहे. तरीही पुन: पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होते कसे हा एक संशोधनाचा विषय आहे. अतिक्रमण कारवाई केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होते. याकडे संबंधित प्रशासन लक्ष देत नाही व तक्रारी वाढू लागल्या, की पुन्हा फक्त कारवाई केल्याचे दिसून येते.
थेरगाव हद्दीतील एमएम शाळेशेजारी मागील अनेक
वर्षांपासून प्राधिकरणाच्या जागेवर अनेक भंगारवाले आपले दुकान
थाटले आहे त्या ठिकाणी शेकडो टन कचरा गोळा करून त्या कचºयाचे वर्गीकरण करून त्या ठिकाणाहून विक्री केली जाते. मात्र या ठिकाणी अनेक वेळा कारवाई करून ही दुकाने हटवण्यात आली. मात्र, पुन्हा या ठिकाणी अनेक दुकाने थाटलेली दिसून येत आहेत.
या भंगार व्यावसायिकांनी बाजारात न विकणारा माल पवना नदीपात्रामध्ये टाकून नदीदेखील प्रदूषित केल्याचे दिसून येत आहे. हे होत असताना महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग, आरोग्य विभाग व प्राधिकरणाचे प्रशासन निव्वळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वाढत्या अतिक्रमणाला महापालिका प्रशासन व प्राधिकरण प्रशासन कधी आळा घालणार, असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
एखाद्या वेळेस मोठ्या प्रमाणात हवा सुटली, की या ठिकाणचा सर्व कचरा मुख्य रस्त्यावर येतो. त्यामुळे परिसर कितीही स्वच्छ केला, तरी परिसरात स्वच्छता दिसून येत नाही. त्यामुळे चांगले काम करणाºया आरोग्य विभागावरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या भागातील अनधिकृत असलेले हे भंगाराचे दुकान हटवण्याची मागणी परिसरातील रहिवासी करू लागले आहेत.