राज्यात तरुणांसाठी रोजगाराच्या संधी कमी होताहेत; दुसरीकडे मोठ्या प्रकल्पांना गुजरातमध्ये पाठवलं जातंय - सुषमा अंधारेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 18:38 IST2025-08-25T18:37:26+5:302025-08-25T18:38:07+5:30
सांस्कृतिक, आध्यात्मिक अस्मितेवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आक्रमण होत आहे

राज्यात तरुणांसाठी रोजगाराच्या संधी कमी होताहेत; दुसरीकडे मोठ्या प्रकल्पांना गुजरातमध्ये पाठवलं जातंय - सुषमा अंधारेंचा आरोप
पुणे: सरकारची मराठी भाषेबद्दलची उदासीनता आणि मराठीविरोधी धोरणे स्पष्ट दिसून येत आहेत. सांस्कृतिक, आध्यात्मिक अस्मितेवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आक्रमण होत आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. महाराष्ट्राचे गुजरातीकरण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठीकारण परिषदेत त्या बोलत हाेत्या.
सिंहगड रस्त्यावरील साने गुरुजी स्मारकात रविवारी (दि. २४) ही मराठीकारण निर्धार परिषद पार पडली. त्यात मराठी भाषेच्या सद्य:स्थितीवर आणि सरकारच्या मराठीविरोधी धोरणांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनिल शिदोरे, माकपचे अजित अभ्यंकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे, विकास लवांडे आणि काँग्रेसचे हणमंत पवार यांनी भूमिका मांडली.
महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसाय गुजरातमध्ये स्थलांतरित होत असल्याबद्दल सुषमा अंधारे यांनी चिंता व्यक्त केली. राज्यात तरुणांसाठी रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. दुसरीकडे मोठ्या प्रकल्पांना गुजरातमध्ये पाठवले जात आहे. हे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला खीळ घालणारे आहे. जातीभेद आणि धार्मिकद्वेष वाढवले जात आहे, असेही त्या म्हणाल्या.
मनसे प्रवक्ते अनिल शिदोरे म्हणाले की, मराठी भाषा टिकवण्यासाठी तसेच दैनंदिन व्यवहारात तिचा अधिकाधिक वापर होण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. मराठी भाषा ही केवळ एक संवाद साधण्याचं साधन नाही, तर ती आपली ओळख आहे. जागतिकीकरणाच्या या युगात इंग्रजीचं महत्त्व वाढत असलं, तरी आपली मातृभाषा जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे.
...तेच अधिक प्रगत
माकपचे अजित अभ्यंकर म्हणाले की, भाषावार प्रांतरचना हा स्वातंत्र्य चळवळीचाच एक भाग होता. ती नंतर कोणाला तरी सुचलेली गोष्ट नाही. भाषिक समाज म्हणून जे-जे समाज अधिक संघटित आहेत, ते सामाजिक दृष्ट्यासुद्धा प्रगत आहे.