पुणे : 'आम्ही गडचा डोंगरचे राहणार, जागर शिवबाचा करणार..', 'हाथी-घोडे-पालकी, जय कन्हैया लाल की', 'अरे दिवानो, मुझे पहचानो', 'में हूँ डॉन..', 'देखा तो तुझे यार.., "आजा सामी, बलम सामी...' अशा हिंदी-मराठी गाण्यांवर डीजेच्या दणदणाटात तरुणाई बिरकली. 'लेझर शो'चा झगमगाट, गोविंदा पथकांनी साकारलेला मानवी मनोन्यांचा थरार, आकर्षक विद्युतरोषणाई, तारे तारकांची हजेरी अन् लाखोंच्या बक्षिसांची उधळण... अशा जल्लोषपूर्ण वातावरणात शनिवारी (दि. १६) दहीहंडी उत्सव साजरा झाला. त्याचवेळी शहरात डीजेमुक्त दहीहंडी साजरी करुन नवा पायंडा पाडण्यात आला.
दरम्यान, १७०० हून अधिक मंडळांनी मिळून तब्बल १७० कोटींची दहीहंडी फोडली असल्याचे चित्र आहे. दहीहंडी उत्सवाचा हा खर्च 'लेझर शो'प्रमाणेच डोळे दीपवून टाकणारा ठरला.
शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड मिळून अधिकृत दहीहंडी उत्सव मंडळांची संख्या १३२७ इतकी आहे. शिवाय शहरात सोसायटधांमध्ये, अंतर्गत रस्त्यांवर व ग्रामीण भागात गावा-गावांत साजऱ्या केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवाची संख्या विचारात घेतली तर हा आकडा १७०० च्या पुढे गेला आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ, गुरुजी तालीम दहीहंडी उत्सव मंडळ, आझाद मित्रमंडळ, गणेश संयुक्त मंडळ, अखिल लक्ष्मी रोड काकाकुआ म्यॅन्शन दहीहंडी उत्सव, महिला गणेश मित्रमंडळ दहीहंडी संघ, कसबा संयुक्त गणेश मंडळ, अखिल बुधवार पेठ दहीहंडी उत्सव.. लोकशगुन मित्रमंडळ, शिवप्रताप मंडळ, श्री कटुबेआळी तालीम मंडळ, अखिल नारायण पेठ दहीहंडी उत्सव, महाराष्ट्र तरुण मंडळ आदींसह सर्वच मंडळांनी लक्षवेधी सोहळा साजरा केला. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण्यांनी दिलेले पाठ'बळ' आणि पोलिसांनी आधीच उत्साह निर्बंधमुक्त असल्याचे जाहीर केल्याने यंदा गोविंदाचा आनंद द्विगुणित झाला. यंदाच्या उत्सवात लाखो रुपयर्याच्या बक्षिसांचा वर्षाव झाला. महापालिकेच्या संभाव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांनी मंडळांना मोठी रसद पुरवली. लाखोंचे मानधन देऊन मोठमोठ्या सेलिब्रिटींना बोलावण्याची मंडळांमध्ये जणू स्पर्धाच लागली होती. ढोल-ताशा पथके, डीजेचा दणदणाट, सजावट आणि इतर खर्च मिळून शहर-जिल्हा-उपनगरांमध्ये तब्बल १८० कोटींची लयलूट केल्याचा अंदाज आहे.
रस्त्यांवर लोटला जनसागर
संभाव्य गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी शहराच्या मध्यभागातील वाहतुकीत आधीच बदल केला होता. सुवर्णयुग तरुण मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट आणि गुरुजी तालीम मंडळ, अखिल मंडई मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा दहीहंडीचा जल्लोष अनुभवण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी पुणेकरांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागला.
'डीजे' मुक्त उत्सव...
पुण्यात मागील काही वर्षांत कर्णकर्कश डीजेमुळे अनेकदा ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना ऐकू कमी येण्याच्या समस्याही उद्भवल्या आहेत. याची दखल घेत यंदा दहीहंडी उत्सव मंडळांनी 'डीजे'मुक्त उत्सव साजरा केला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील तब्बल २१ मंडळांनी संयुक्तपणे 'डीजे मुक्त दहीहंडी उत्सव साजरा करून नवा पायंडा पाडला आहे. पुणेकरांसह या उपक्रमावर सर्व स्तरांतून कौतुकांचा वर्षाव पाहायला मिळत आहे.
सेलिब्रिटींनी वाढवला 'ग्लॅमर'
यंदा पारंपरिक बराराबरोबरच सेलिब्रिटींच्या उपस्थितीने दहीहंडी उत्सव उजळून निघाला. मराठी, बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांनी शहरातील विविध दहीहंडी कार्यक्रमांना हजेरी लावून उत्सवात ग्लॅमरची विशेष भर घातली. यंदा श्रीलीला या दाक्षिणात्य अभिनेत्रीने लक्ष वेधून घेतले. श्रीलीला, गौतमी पाटील, निकी तांबोळी, राधा पाटील, अदिती पोहनकर, विनीत कुमार सिंग, श्रुती मराठे, जुही शेरकर, उपेंद्र लिमये, सई मांजरेकर, अभिजित सावंत, ऊर्मिला कानेटकर, प्राजक्ता गायकवाड, ईशा केसकर, ईशा मालविया, संजना काळे, खुशी शिंदे, गौरी कुलकर्णी आदींनी उपस्थिती लावली.