इलेक्ट्रिक वाहने वाढली; विक्रीपश्चात सेवा मात्र अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 08:57 IST2025-05-15T08:56:44+5:302025-05-15T08:57:48+5:30
-प्रशिक्षित मेकॅनिक, सुट्या भागांची वानवा; दुरुस्तीसाठी महिन्याची प्रतीक्षा

इलेक्ट्रिक वाहने वाढली; विक्रीपश्चात सेवा मात्र अंधारात
- अंबादास गवंडी
पुणे : वाढत्या पेट्रोल, डिझेलचे दर, इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर सवलत यामुळे ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात ई-वाहन खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होत आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करून एक ते दोन वर्षे झाल्यानंतर वाहनांची देखभाल दुरुस्ती, गाड्यांचे सुटे भाग मिळण्यात सातत्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनांच्या शोरूममध्ये फेऱ्या माराव्या लागत असून, वाहन दुरुस्तीसाठी एक ते दीड महिना वाट पाहावी लागत आहे.
केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन दिले जात आहे. आता राज्य सरकारकडून महामार्गावर टोल फ्री करण्यात आले आहे. शिवाय ई-वाहनांमुळे प्रदूषण कमी होते. त्यामुळे सरकारकडून ई-वाहन खरेदीसाठी सवलत देखील दिली जात आहे. त्यामुळे ई-वाहन खरेदीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच त्यांच्याकडूनही सवलती देऊन ई-वाहने खरेदीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. नागरिकांकडून दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी ई-वाहने खरेदी केली जात आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ई-वाहने खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे; परंतु गेल्यावर्षी यामध्ये घट झाली आहे. सध्या पुण्यात लाखांपेक्षा जास्त ई-वाहने खरेदी करण्यात आली असून, रस्त्यावर धावत आहेत; मात्र, इलेक्ट्रिक वाहन रस्त्यात बंद पडल्यानंतर दुरुस्तीसाठी प्रशिक्षित मेकॅनिकची आवश्यकता असते; पण त्यांची कमतरता आहे. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दुरुस्तीसाठी दोन महिने थांबा
इलेक्ट्रिक वाहनामध्ये बिघाड झाला तर वेळेवर दुरुस्ती करून मिळत नाही. शिवाय शहरात ई-वाहने दुरुस्त करणारी गॅरेज बोटावर मोजण्याएवढीच आहेत. अनेक ठिकाणी ई-बाइकची शोरूम बंद झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना ई-वाहने दुरुस्तीसाठी शोरूम शोधत फिरावे लागत आहे. ई-वाहन बंद पडले, तर ते ढकलत अथवा क्रेन लावून नेण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यात शोरूमध्ये ई-वाहन दुरुस्ती देखभालीसाठी मोठी प्रतीक्षा यादी असते. त्यात वाहनाचे सुटे भाग मिळत नसल्याने नागरिकांना काही वेळा महिनाभर वाहन दुरुस्तीची वाट पाहावी लागते.
चार्जिंग स्टेशनची कमतरता
शहरात ई-वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण, त्या प्रमाणात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढलेली नाही. महापालिकेने काही ठिकाणी चारचाकी वाहनांसाठी चार्जिंगची सोय केली आहे; पण दुचाकी चार्जिंगसाठी शहरात कोठेही सोय नाही. त्यामुळे नागरिकांना, इलेक्ट्रिक दुचाकीचालकांना याचा फटका बसत आहे. रस्त्यात चार्जिंग संपल्यावर गाडी बंद पडते. त्यावेळी जवळ चार्जिंगची सोय नसल्यामुळे नाहक त्रास होणार आहे.
शहरातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या
-वर्ष वाहन संख्या
२०२२-२३ २५,५८८
२०२३-२४ ३२,८३६
२०२४-२५ १३,६८९
ई-बाइक घेताना खरेदीवर सवलत होती. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी गाडी खरेदी केली. त्यानंतर वर्षभर कोणतेही अडचण नव्हती. एके दिवशी अचानक गाडी सुरू होईना. त्यामुळे गाडी सर्व्हिस सेंटरला घेऊन गेलो. दुरुस्तीसाठी २० ते २५ दिवस लागतील असे सांगितले गेले; परंतु एक महिना झाला तरी गाडी दुरुस्त झालेली नाही.
-सागर सूर्यवंशी, वाहनधारक